Sat, Jul 20, 2019 23:23होमपेज › Pune › वरिष्ठ नेत्यांचा स्थानिक नेत्यांवर ‘हल्लाबोल’ 

वरिष्ठ नेत्यांचा स्थानिक नेत्यांवर ‘हल्लाबोल’ 

Published On: Apr 13 2018 1:19AM | Last Updated: Apr 13 2018 12:07AMवडगाव मावळ : गणेश विनोदे

मावळ तालुक्यात कामशेत येथे झालेल्या राष्ट्रवादीच्या हल्लाबोल आंदोलनात सर्वच वरिष्ठ नेत्यांनी तालुक्यातील स्थानिक नेत्यांमधील मतभेदांचा उल्लेख करुन आता तरी हे हेवेदावे संपवा, असे आवाहन करत स्थानिक नेत्यांवर हल्लाबोल केला. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासूनच मावळ तालुक्यात पक्षाला गटबाजीची कीड लागली असून, ही कीड आता नेत्यांपुरती मर्यादित न राहता गावोगावच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोचली आहे. त्यामुळे मावळात गेली 25 वर्षे पक्षाला यश मिळविता आलेले नाही.

सतत पराभव होवूनही तालुक्यातील स्थानिक नेतेमंडळींचे डोळे मात्र अजूनही उघडताना दिसत नाहीत. पक्षामध्ये मातब्बर नेतेमंडळी आहेत. कार्यकर्त्यांची मोठी फौजही आहे; परंतु, कोणीच कोणाचे नेतृत्व मानायला तयार नसल्याने भविष्यात तरी पक्षाला अच्छे दिन येतील का, हा प्रश्‍न आहे. हल्लाबोल आंदोलनाच्या तयारीमध्येही चढओढ झाल्याने तालुक्यात गटातटाचे राजकारण सुरु असल्याचे स्पष्टपणे जाणवले. परंतु, हल्लाबोलच्या व्यासपीठावर मात्र सगळे नेते एकत्र बसलेले पाहून कार्यकर्ते समाधानी झाले होते.

तालुकाध्यक्ष गणेशआप्पा ढोरे यांनी अहोरात्र झटून पक्ष संघटना मजबूत केल्याचे सांगितले. तर जिल्हा बँकेचे संचालक बाळासाहेब नेवाळे यांनी तालुक्यात सत्ताधारी भाजप सत्तेसाठी कुठल्याही थरापर्यंत जात असल्याचा आरोप केला.  दरम्यान ज्येष्ठ नेते बापूसाहेब भेगडे यांनी भाजपला रोखायचे असेल तर आपल्यातले हेवेदावे संपलेच पाहिजेत, असे आवाहन केले. मदन बाफना यांनी भेगडे यांच्या वक्तव्याशी 100 टक्के सहमत असल्याचे मत व्यक्त केले; तसेच  आतातरी शहाणे व्हा आणि पक्षाचा आमदार निवडून आणा असे आवाहन केले. खासदार सुप्रिया सुळे यांनीही बाफना यांच्याच वक्तव्याची री ओढून नेत्यांनी आपआपसातील मतभेद दूर करावेत व कार्यकर्त्यांनी जोमाने काम करुन बाफना यांची इच्छा पूर्ण करावी असे आवाहन केले. यानंतर जयंत पाटील, धनंजय मुंढे, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनीही हेवेदावे विसरून पक्षासाठी काम करा असे आवाहन केले. दरम्यान, अजित पवार यांनी तर थेट व्यासपीठावर बसलेल्यांनी एकदिलाने काम केले तर कोण आपल्याला रोखू शकतो असा सवाल करत पक्ष देईल त्या उमेदवाराचे काम कार्यकर्ते तर करणारच आहेत  परंतु, पहिल्यांदा व्यासपीठावरील नेत्यांनीही प्रामाणिकपणे करावे असे आवाहन केले.

तर मीच उभा राहतो : अजित पवार

मावळात कृष्णराव भेगडे, मदन बाफना यांच्यानंतर सलग पाचवेळा मावळ तालुक्यात पक्षाला पराभव पत्कारावा लागला आहे. या पराभवाला केवळ स्थानिक नेत्यांचे मतभेदच कारणीभूत असून तुम्ही म्हणत असाल तर मावळातून मीच उभा राहतो, पण कुठल्याही परिस्थितीत आता मावळचा आमदार द्या, असे आवाहन केले.

मावळचा दौरा करणार : मदन बाफना

दरम्यान, आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूकीत यश मिळवायचे असेल तर नेत्यांमधील हेवेदावे मिटणे आवश्यक असून हल्लाबोल अंदोलनानंतर स्वत: तालुक्याचा दौरा करुन नेत्यांपासून तळागाळातल्या कार्यकर्त्यांपर्यंत चर्चा करुन हेवेदावे संपविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे माजी मंत्री मदन बाफना यांनी सांगितले.