Sat, Jul 20, 2019 15:00होमपेज › Pune › ‘कुकर’च्या शिट्ट्यांकडे लक्ष देण्याची गरज नाही

‘कुकर’च्या शिट्ट्यांकडे लक्ष देण्याची गरज नाही

Published On: Feb 28 2018 1:13AM | Last Updated: Feb 28 2018 12:33AMपिंपरी :वर्षा कांबळे

कधी काळी कुकर लावल्यानंतर इतर कामात व्यस्त झाल्यावर किती शिट्ट्या झाल्या याकडे दुर्लक्ष होते. यामुळे आतील पदार्थ खूपच शिजतो किंवा करपून जातो, किंवा वेळेपूर्वी गॅस बंद केल्याने पदार्थ कच्चा राहतो. यासाठी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी गॅस शेगडीला जोडणारे एक डिव्हाईस तयार केले आहे. जेणेकरून या डिव्हाईसवर किती शिट्ट्या पाहिजेत, हा टायमर सेट केल्यानंतर गॅस रेग्युलेटर आपोआप बंद होईल. 

पुण्यातील अनंतराव पवार कॉलेजमधील प्रा. शरद जगताप, विकास चव्हाण, संजयकुमार वाढई यांनी हे डिव्हाईस तयार केले आहे.स्वयंपाक करताना कुकरमध्ये वेगवेगळे पदार्थ शिजविताना कधी कमी, तर कधी जास्त शिट्ट्या कराव्या लागतात. उदा. बटाटे, डाळ, किंवा कडधान्ये शिजविताना जास्त शिट्ट्या कराव्या लागतात. त्या वेळी प्रत्येक शिट्टी मोजणे शक्य होत नाही. कधी कधी गॅस लवकर बंद केल्यावर आतील पदार्थ कच्चा राहतो आणि परत शिजविण्यासाठी आणखी शिट्ट्या द्याव्या लागतात. काही पदार्थ एकदा कच्चे राहिले की कितीही शिजविले तरी कच्चे राहतात. या उलट कधी जास्त शिट्ट्यांमुळे कुकरचा वायसर खराब होणे, झाकण उडणे अशा घटना होतात. अशा प्रकारे नकळत गॅसचा अपव्यय होतो. अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी बनविलेल्या या डिव्हाईसमध्ये शिट्ट्या मोजण्यासाठी माईक सेन्सर बसविला आहे. वेळ सेट करण्यासाठी टायमर, डिव्हाईस काऊंटर बसविला आहे. यामध्ये शिट्ट्या मोजल्या जातील; तसेच डिव्हाईसला डिस्पले लावला आहे. त्यामध्ये बझर इंडिकेट केला आहे. टायमर सेट केल्यानंमर बझर होईल आणि गॅस आपोआप बंद होईल. 

गॅस आपोआप बंद होण्यासाठी डिव्हायईसच्या बटणामध्ये स्प्रिंग असेंबल केली आहे.  स्प्रिंगमध्ये सर्व एनर्जी स्टोअर होईल. ज्यामुळे स्प्रिंगचा ताण त्यावर येईल आणि मशिन ऑपरेट होईल आणि जितकी मिनिटे किंवा तास टाइमर सेट कराल त्यानंतर गॅस रेग्युलेटर बंद होईल. हे डिव्हाईस फक्त कुकरसाठीच नाही, तर इतरही भांड्यांसाठी वापरता येते. उदा.  वरण, भात, अंडी उकडण्यासाठी अंदाजे जेवढा एखादा पदार्थ शिजण्यासाठी जितका वेळ लागेल तितका वेळ टाईमर सेट करा आणि गॅसची बचत करा.