होमपेज › Pune › तिहेरी तलाक विधेयकाला विरोध : ओवैसी

तिहेरी तलाक विधेयकाला विरोध : ओवैसी

Published On: Mar 10 2018 10:51PM | Last Updated: Mar 10 2018 10:51PMपुणे : प्रतिनिधी

तिहेरी तलाक कायद्याने सर्वात जास्त अन्याय हा महिलांवर होणार आहे. आमचा विरोध हा तिहेरी तलाकविरोधातील सुधारणांनी नाही. तर, सरकार आणत असलेल्या विधेयकाला आहे, असे मत एमआयएम पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी व्यक्त केले. तर, पंतप्रधान मोदी यांनी स्वताच्या डोळ्यावरची व बुद्धीवरील झापड दूर करावीत. तुम्ही शरियतमध्ये ढवळाढवळ करून आमचा रोष ओढळून घेत असल्याचे हल्लाही यावेळी ओवैसी यांनी केला. 

ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डच्या वतीने शनिवारी पुण्यात तिहेरी तलाक विधेयकाच्या विरोधात आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनाच्या समारोपप्रसंगी ओवैसी बोलत होते. यावेळी ओवेसी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती टीका केली. यावेळी व्यासपीठावर आमदार इम्तियाज जलील, मौलाना आयुब अशरफी, अशरफ अली वारसी यांच्यासह मोठ्या प्रमाणात महिला तसेच मुस्लिम नागरिक उपस्थित होते.  

ते म्हणाले, आमचा विरोध हा तिहेरी तलाकविरोधातील सुधारणांना नाही, तर तो मोदी सरकारच्या विधेयकाला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये देशात तिहेरी तलाकचे प्रमाण घटले आहे. गेल्यावर्षी काढण्यात आलेल्या 3 लाख 40 हजार 206 फतव्यांपैकी फक्त 650 फतवे हे तिहेरी तलाकचे होते. कायदा करून तिहेरी तलाकसारख्या प्रथांना आळा बसणार असेल तर मग हुंडाबळी आणि इतर वाईट प्रथांविरोधातील कायद्यांचे काय? केवळ कायदा केल्याने गुन्हे थांबतात का?, असा सवाल ओवेसी यांनी उपस्थित केला. आज आमच्या भगिनींनी आंदोलन करून सरकारला आणि मुस्लिम पुरूषांना इशारा दिला आहे. जेणेकरून मुस्लिम पुरुष शरियतच्या रक्षणासाठी उभे राहतील, असे ओवेसी यांनी सांगितले. 

ओवेसी यांच्या सभेआधी पोलिसांनी त्यांना एक नोटीस पाठवून, जास्त भडकाउ भाषण न कल्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यावरही त्यांनी टीका केले. ओवेसी म्हणाले, “मी भाषण करायचे म्हटले तर पोलिसांकडून मला नोटीस पाठवली जाते. उद्या याच ठिकाणी अन्य कोणी  भाषण करत असतील तर पोलिस दुरूनच त्यांना पाहून निघून जातील. सरकार सध्या बाबरी मशिदीच्या मुद्द्यावरून राजकारण करत आहे. त्यासाठी सरकारने 2020 सालचा मुहूर्त निश्‍चित केला आहे. मात्र, दुसरीकडे त्यांना शेतकर्‍यांच्या आत्महत्या आणि बँकांना लुटून फरार होणारे उद्योगपती दिसत नाहीत.’’ अशी टीकाही ओवेसी यांनी केली.