Mon, Nov 19, 2018 14:43होमपेज › Pune › नाशिक फाटा चौकातील लुप चुकला

नाशिक फाटा चौकातील लुप चुकला

Published On: Jan 08 2018 1:15AM | Last Updated: Jan 07 2018 11:37PM

बुकमार्क करा
पिंपरी : प्रतिनिधी 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने कासारवाडीतील नाशिक फाटा चौकात भारतरत्न जेआरडी टाटा दुमजली उड्डाणपूल बांधण्यात आला आहे. त्या ठिकाणी उभारलेला लुप चुकीचा असून, तो वापराअभावी धूळखात पडला आहे. यावर झालेला सुमारे 14 कोटींचा खर्च महापालिकेच्या अधिकार्‍यांकडून वसूल करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते रमेश वाघेरे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.

नाशिक फाटा चौकात दुमजली उड्डाणपूल 100 कोटींपेक्षा अधिक निधी खर्च करून बांधला आहे. पिंपळे गुरवहून भोसरीच्या दिशेने जाणार्‍या पुलावरून नाशिक फाटा चौकात उतरण्यासाठी लुपही बांधण्यात आला होता. त्यावर सुमारे 14 कोटी रुपये खर्च झाला आहे. उड्डाणपूल वाहतुकीस खुला करून 3 वर्षांचा कालावधी लोटला आहे; मात्र तेव्हापासून आतापर्यंत हा लुप वाहतुकीस खुला केलेला नाही. तो लुप वापराअभावी धूळखात पडला आहे. हा लुप वाहतूक पोलिसांची परवानगी न घेताच महापालिकेने बांधला आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी सदर लुप वाहतुकीस खुला करण्यास परवानगी नाकारली आहे. त्यामुळेच हा लुप वाहतुकीस बंद ठेवला आहे, असा आरोप  वाघेरे यांनी केला आहे. त्यामुळे महापालिकेने खर्च केलेले 14 कोटी रुपये पाण्यात गेले आहेत. त्यामुळे संबंधित सह शहर अभियंता राजन पाटील, उपअभियंता श्रीकांत सवणे, उपअभियंता अनिल राऊत; तसेच प्रकल्प सल्लागार, आर्किटेक्ट यांच्यावर कारवाई करून सदर खर्च त्यांच्याकडून वसूल करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे; अन्यथा न्यायालयात जाणार्‍या इशारा त्यांनी दिला आहे.