Sun, Mar 24, 2019 08:15होमपेज › Pune › कठोर धर्म चिकित्सा हीच दाभोलकरांना श्रद्धांजली : रावसाहेब कसबे

कठोर धर्म चिकित्सा हीच दाभोलकरांना श्रद्धांजली : रावसाहेब कसबे

Published On: Aug 20 2018 7:49PM | Last Updated: Aug 20 2018 7:49PMपुणे : प्रतिनिधी

आपल्याला आपल्या संतांची चळवळ समाजासाठी वापरता आली नाही. आपण संत चळवळीकडे दुर्लक्ष केले. तुकाराम हे पाहिले संत ज्यांनी ‘ईश्वराची निर्मिती ही माणसांनी’ केली हे सांगितले. आपण सुद्धा महाराष्ट्रात कीर्तनकार उभे केले पाहिजे. आपले कीर्तनकार जगण्याचे प्रयोजन सांगतील. गांधीजी तुरुंगात असताना भागवत गीता वाचत असत. तर, त्यांना मारणारासुद्धा भगवतगीता वाचत होता. या ग्रंथाचे पाहिजे तसे अर्थ आपण घेऊ शकतो. कठोर धर्म चिकित्सा हीच दाभोलकरांना खरी श्रद्धांजली आहे, असे मत ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे यांनी व्यक्त केले.

अंधश्रद्धा निर्मुलन समितीतर्फे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमीत्त ‘जवाब दो’ या कार्यक्रमांतर्गत डॉ. नरेंद्र दाभोलकर लिखित ‘भ्रम और निरास’ या हिंदी पुस्तकाचा लोकार्पण सोहळा आयोजीत करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रा. चंदा काशीद, प्रा. गिरीश काशीद, अनुवादक प्रा. विजय शिंदे उपस्थित होते.

रावसाहेब कसबे म्हणाले, ‘आपण इतर मनुष्य जातीपेक्षा वेगळे आहोत’ हे दाखविण्यासाठी धर्माचा उगम आहे. मात्र, जस-जसा काळ बदलत जातो, तसे या विचारांचे लोक बदलत जातात. विवेक वाद हा धर्माच्या विरोधात आहे का? याचे जागरण आपण देशात करू शकलो नाही. लोकमान्य टिळक हे हिंदुत्ववादी होते. त्यामुळे, ‘स्वराज्य म्हणजे स्वधर्म’ हे विचार घेऊन ते सोबत चालले होते. टिळकांनी पाश्चिमात्य विचारांना नकार दिला होता. आधुनिकतेचा विचार म्हणजे विवेक वादाचा विचार. तुम्हाला विवेक वाद समजायचा असल्यास माणूस समजून घ्यावा लागेल. डॉ. नरेंद्र दाभोलकर हे क्रांतिवीर होतील या विचारांनी मी जगतो आहे, असेही ते म्हणाले.

रावसाहेब कसबे म्हणाले, माणूस इथे कसा राहणार याबद्दल धर्म काही बोलत नाही. माणूस आला कुठून आणि जाणार कुठे इतकंच धर्म सांगतो. आपण आलो कुठून या प्रश्नाचे उत्तर सर्व धर्मानी दिले आहे. प्रत्येक धर्म म्हणतो आपली निर्मिती ईश्वराने केली आहे. वेदांमध्ये जाती कशा निर्माण झाल्या याचा उल्लेख आहे. अंधश्रद्धेचा प्रश्न धर्माशी निगडित नसून मानवाशी संबंधित आहे. जोवर समान नागरिक कायदा येत नाही तोवर देशात असेच चालणार. काही तरी ठोस पाऊले उचलायला हवी. हिंदू मुस्लिम समोरा-समोर चर्चा बंद होईल तेव्हाच समान नागिरीक कायदा अस्तित्वात येईल. नुकतेच सापडलेले शस्त्रसाठे पुढे निवडून येऊ शकणार्‍या धर्मनिरपेक्ष सरकारला अडचणीत आणण्यासाठी आहेत. आपला राष्ट्रवाद हा मानवी, विवेकी राष्ट्रवाद आहे. यापुढे मनुस्मृती आणि भारतीय राज्यघटना यातील एकाची निवड करायला हवी.