Mon, Aug 19, 2019 18:02होमपेज › Pune › नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण : वीरेंद्रसिंह तावडेला जामीन द्या 

नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण : वीरेंद्रसिंह तावडेला जामीन द्या 

Published On: Jun 27 2018 9:17PM | Last Updated: Jun 27 2018 9:17PMपुणे : प्रतिनिधी 

अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या केल्याप्रकरणात सनातन संस्थेचा साधक वीरेंद्रसिंह तावडे यांना सीबीआयने केवळ संशयावरून अटक केली आहे. त्यामुळे त्यांना जामीन देण्यात यावा अशी मागणी बचाव पक्षाच्या वकीलांनी बुधवारी तावडेच्या जामीनावर युक्तीवाद करताना केली. विशेष न्यायाधीश ए. एस. भैसारे यांच्या न्यायालयात ही सुनावणी झाली.  

वीरेंद्रसिंह तावडे, विनय पवार आणि सारंग अकोलकर आणि इतरांच्या मदतीने  दाभोलकरांची हत्या केल्याचे सीबीआयने केलेल्या तपासात निष्पन्न झाल्याने दोन वर्षापूर्वी याप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. त्यामध्ये नरेंद्र दाभोलकर अंधश्रद्धा निर्मुलनाविषयी बोलतात़ संत लोकांविरुद्ध, देवाबद्दल अनुदगार काढतात चमत्काराला आव्हान देतात याच कारणांमुळे त्याची हत्या करण्यात आल्याचेही सीबीआयने आरोपपत्रात नमूद केले होते.  

सीबीआयने १ जून रोजी वीरेंद्रसिंह तावडे याच्या पनवेल येथील घरी तसेच सनातन संस्थेच्या आश्रमावर छापा टाकला होता, तसेच सारंग अकोलकर याच्या पुण्यातील घरावरही छापा टाकला होता त्यातून उपलब्ध झालेल्या माहितीवरुन सीबीआयने १० जून २०१६ ला तावडे याला अटक केली होती. दरम्यान, कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणी कोल्हापूर पोलिसांनी तावडेला अटक केली होती. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी बालगंधर्व रंगमंदिराजवळ शिंदे पुलावर हत्या झाली. याप्रकरणी विविध साक्षीदारांचे साक्षीपुरावे, सीसीटीव्हीमध्ये दिसून आलेले संशयितांचे फोटो, रेखाचित्रे, वीरेंद्रसिंह तावडे याच्या घरी व सनातन संस्थेवरील छाप्यात आढळून आलेली वेगवेगळी कागदपत्रे, सनातन वृत्तपत्राची अनेक बातम्यांची कात्रणे, विविध वृत्तपत्रात आलेल्या बातम्यांची कात्रणे, दाभोलकर व अंधश्रद्धा निर्मुलन समितीविषयी सनातनमध्ये छापण्यात आलेली व्यंगचित्रे जप्त केलेल्या हार्ड डिक्स जप्त करण्यात आल्या होत्या. 

याप्रकरणात गेली दोन वर्षापासून तावडे हा अटकेत असून त्याला जामीन मंजूर करण्यात यावा. जे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होते, त्याच्या बोलण्यामध्ये तफावत आहे. गुन्ह्यात वापरलेली दुचाकीही अद्याप जप्त करण्यात आली नाही. सीबीआयने केवळ संशयावरून तावडेला अटक केली आहे. उच्च  न्यायालयाने त्याच्या आरोप निश्‍चितीसाठी स्थगिती दिली आहे. सीबीआयच्या तपासामध्येही प्रगती नसून त्यांना जामीन देण्याची मागणी बचाव पक्षाचे वकील अ‍ॅड. समीर पटवर्धन यांनी केली. तावडेच्या जामीवर म्हणणे सादर करण्यासाठी सरकारी वकील मयांक मखीजा यांनी वेळ मागितला असून यावरील पुढील सुनावणी ६ जुलै रोजी होणार आहे.