Sun, Sep 23, 2018 08:28



होमपेज › Pune › नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, तावडेचा जामीन फेटाळला 

नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, तावडेचा जामीन फेटाळला 

Published On: Jul 06 2018 7:06PM | Last Updated: Jul 06 2018 7:06PM



पुणे : प्रतिनिधी 

अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या केल्याप्रकरणात सनातन संस्थेचा साधक विरेंद्रसिंह तावडे याचा जामीन विशेष न्यायाधीश ए. एस. भैसारे यांनी फेटाळून लावला आहे. या पूर्वीही तावडेचा जामीन सत्र न्यायालयाने फेटाळून लावला होता. 

विरेद्रसिंह तावडे, विनय पवार आणि सारंग अकोलकर आणि इतरांच्या मदतीने  दाभोलकरांची हत्या केल्याचे सीबीआयने केलेल्या तपासात निष्पन्न झाल्याने दोन वर्षापूर्वी याप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. त्यामध्ये नरेंद्र दाभोलकर अंधश्रद्धा निर्मुलनाविषयी बोलतात संत लोकांविरुद्ध, देवाबद्दल अनुदगार काढतात, चमत्काराला आव्हान देतात. याच कारणांमुळे त्यांची हत्या करण्यात आल्याचेही सीबीआयने आरोपपत्रात नमूद केले होते.  

सीबीआयने १ जून रोजी विरेंद्रसिंह तावडे याच्या पनवेल येथील घरी तसेच सनातन संस्थेच्या आश्रमावर छापा टाकला होता. तसेच सारंग अकोलकर याच्या पुण्यातील घरावरही छापा टाकला होता. त्यातून उपलब्ध झालेल्या माहितीवरुन सीबीआयने 10 जून 2016 रोजी तावडे याला अटक केली होती. दरम्यान, कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणी कोल्हापूर पोलिसांनी तावडेला अटक केली होती. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची 20 ऑगस्ट 2013 रोजी बालगंधर्व रंगमंदिराजवळ शिंदे पुलावर हत्या झाली.  याप्रकरणी विविध साक्षीदारांचे साक्षीपुरावे, सीसीटीव्हीमध्ये दिसून आलेले संशयितांचे फोटो, रेखाचित्रे, विरेंद्रसिंह तावडे याच्या घरी व सनातन संस्थेवरील छाप्यात आढळून आलेली वेगवेगळी कागदपत्रे, सनातन वृत्तपत्राची अनेक बातम्यांची कात्रणे, विविध वृत्तपत्रात आलेल्या बातम्यांची कात्रणे, दाभोलकर व अंधश्रद्धा निर्मुलन समितीविषयी सनातनमध्ये छापण्यात आलेली व्यंगचित्रे जप्त केलेल्या हार्ड डिक्स जप्त करण्यात आल्या होत्या. 

याप्रकरणात गेल्‍या दोन वर्षापासून तावडे अटकेत असून त्याला जामीन मंजूर करण्यात यावा. जे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होते, त्याच्या बोलण्यामध्ये तफावत आहे. गुन्ह्यात वापरलेली दुचाकीही अद्याप जप्त करण्यात आली नाही. सीबीआयने केवळ संशयावरून तावडेला अटक केली आहे. उच्च  न्यायालयाने त्याच्या आरोप निश्‍चितीसाठी स्थगिती दिली आहे. सीबीआयच्या तपासामध्येही प्रगती नसून त्यांना जामीन देण्याची मागणी बचाव पक्षाचे वकील अ‍ॅड. समीर पटवर्धन यांनी केली. त्याला विरोध करताना शुक्रवारी विशेष सरकारी वकील मनोज चालदन यांनी विरोध करताना सांगितले, यापूर्वविही एकदा तावडेचा जामीन न्यायालयाने फेटाळून लावला आहे. जामीन मिळावा यासाठी कोणतेही ठोस कारण नाही. गौरी लंकेश प्रकरणात एका संघटनेचे नाव तपासात समोर आले आहे. त्यात काही लोकांचा सहभाग असल्याची बाब तपासात समोर आली आहे. या संघटनेशी तावडे संबंधित असल्याने त्याला जामीन दिल्यास साक्षी पुराव्यांवर दबाव येण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याचा जामीन अर्ज फेटाळण्याची मागणी केली. सरकारी पक्षाचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने तावडेचा जामीन फेटाळून लावला आहे.