होमपेज › Pune › राज ठाकरे यांचे एक मत कमी झाले : नाना 

राज ठाकरे यांचे एक मत कमी झाले : नाना 

Published On: Nov 30 2017 7:31PM | Last Updated: Dec 01 2017 8:22AM

बुकमार्क करा

पुणे: प्रतिनिधी 

लोकशाहीमध्ये प्रत्येक माणसाला आपापले मत मांडण्याचा अधिकार असून फेरीवाल्यांसंदर्भात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांचा मुद्दा मांडला व मी माझा मुद्दा मांडला. राज ठाकरे यांचे वैयक्तिक काहीही नुकसान झालेले नसून मनसेचे एक मत मात्र कमी झाले, अशी बोचरी टीका अभिनेते नाना पाटेकर यांनी गुरुवारी (दि. 30) पत्रकारांशी बोलताना केली. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) दीक्षान्त समारोह कार्यक्रमाप्रसंगी नाना उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते. 

फेरीवाले अत्यंत गरीब असून त्यांचे हातावर पोट आहे. त्यांना अशाप्रकारे मारहाण करून हाकलून लावणे चुकीचेच आहे. यामुळे त्यांना व्यवसाय करण्यासाठी प्रशासनाने विशिष्ठ ठिकाणी जागा उपलब्ध करुन द्यावी, एवढेच आपण सांगितले होते. संजय लीला भन्साळी यांच्या अगामी काळात प्रदर्शित होणार्‍या पद्मावती चित्रपटाविषयी बोलताना नाना म्हणाले की आजवर क्रांतीवीर सारखे अनेक चित्रपट केले. मात्र, यामुळे समाजामध्ये तेढ निर्माण होऊन कुठल्याही प्रकारचा वाद होणार नाही, याची मी काळजी घेतली. बाजीराव मस्तानी असो किंवा पद्मावती असो, यांसारख्या चित्रपटांवर समाज का दुखावला जातो, वादविवाद का ओढावला जातो याबाबात भन्साळी यांनी आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. काही लोकांकडून भन्साळी यांना मारण्याची भाषा केली जाते, याचे समर्थन होऊ शकत नसून त्यांना मारणे हा पर्याय असूच शकत नाही. न्यूड व एस. दुर्गा या चित्रपटाबाबत विचारले असता याबाबत अधिक काही माहिती नसल्याचे सांगत यावर भाष्य करण्याचे त्यांनी टाळले. 

विद्यार्थ्यांचा त्याग महत्त्वाचा
विद्यार्थी करत असलेला त्याग महत्वाचा आहे. विद्यार्थ्यांनी केलेल्या कठोर परिश्रमामुळे भारताचे भविष्य सुरक्षित असल्याचे जाणवते. देशाच्या रक्षणासाठी सर्व गोष्टींचा त्याग करुन विद्यार्थी रात्रंदिवस करत असलेले कष्ट पाहून आपल्यामध्ये एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते.  भारताला केवळ सीमेवरच भीती आहे असे नसून देशांतर्गत चाललेला छुपा संघर्ष देखील तेवढाच कारणीभूत असल्याचे नाना पाटेकर यांनी यावेळी सांगितले.