Sun, Mar 24, 2019 08:17होमपेज › Pune › नागराज मंजुळेंच्या आगामी चित्रपटाचे शुटींग पुढे ढकलेले

नागराज मंजुळेंच्या आगामी चित्रपटाचे शुटींग पुढे ढकलेले

Published On: Mar 02 2018 8:34PM | Last Updated: Mar 02 2018 8:33PMपुणे : प्रतिनिधी 

दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या आगामी हिंदी चित्रपटाच्या शुटिंगसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात उभारण्यात आलेला चित्रिकरणाचा सेट काढण्याचे काम सुरु झाले आहे. चित्रपटाचा सेट बांधण्याइतकेच सेट काढून घेणेही जिकिरीचे काम असल्याने सेट काढण्यासाठी आणखी काही दिवस लागणार आहेत. काही तांत्रिक अडचणींमुळे हिंदी चित्रपटाच्या शुटिंगचे काम अनिश्‍चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले असल्याची माहिती दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी दिली. 

दिग्दर्शक नागराज मंजुळे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यासमवेत फुटबॉल खेळावर हिंदी चित्रपट बनवत आहेत. या चित्रपटाच्या शुटिंगसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाद्वारे विद्यापीठाचे मैदान ४५ दिवसाच्या भाडे करारावर देण्यात आले होते. विद्यापीठाचे मैदान शुटिंगला देताना नियमांना डावलण्यात आल्याने आणि दिलेल्या कालावधीत शुटिंग पूर्ण न केल्याने विद्यापीठाच्या मैदानात उभारण्यात आलेला सेट काढण्याची मागणी विद्यार्थी संघटनांनी केली होती. त्यानुसार विद्यापीठाने मंजुळे यांना सेट काढण्याचा आदेश दिला होता. 

त्यानुसार नागराज मंजुळे यांनी फेसबुकद्वारे आपली भुमिका मांडली आहे, माझ्या हिंदी फ़िल्मचे शूटिंग काही तांत्रिक अडचणींमुळे अनिश्‍चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले आहे. कालपासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मैदानावर उभा असलेला सेट काढण्याचे काम सुरु झाले आहे. सेट बांधण्याइतकेच फ़िल्मचा सेट काढून घेणेही जरा जिकिरीचे काम असल्याने आणखी काही दिवसांच्या अवधित सेट काढण्याचे काम पूर्ण होईल. तसेच विद्यापीठाने केलेल्या सहकार्याबद्दल मी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा अत्यंत ऋणी राहीन, असे मंजुळे यांनी यामध्ये नमूद केले आहे.