Sat, Nov 17, 2018 02:13होमपेज › Pune › मुस्लिम मूक महामोर्चाला पुण्यात सुरुवात

मुस्लिम मूक महामोर्चाला पुण्यात सुरुवात

Published On: Sep 09 2018 11:07AM | Last Updated: Sep 09 2018 11:07AMपुणे : प्रतिनिधी

मुस्लिम समाजाला दिलेले ५ टक्के आरक्षण कायम करावे यासह विविध मागण्यांसाठी पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि पुणे जिल्हा मुस्लिम मूक महा मोर्चाच्या वतीने गोळीबार मैदान ते विधानभवनपर्यंत मूक मोर्चा काढण्यात आला असून मोर्चाला सुरुवात झाली आहे. मोर्चाला पुणे शहर आणि जिल्ह्यातील विविध पक्ष संघटनांनी पाठिंबा दिला आहे. मुस्लिम समाजासह अनेक पक्ष संघटनाचे कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.

आघाडी सरकारने दिलेलं 5 टक्के आरक्षण  न्यायालयाने कायम ठेवण्यास सांगितले आहे, मात्र, राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच युती सरकार आरक्षणाची अंमलबजावणी करत नाही, असा आरोप आंदोलकांनी केला आहे. आरक्षण कायम करावे या प्रमुख मागणीसह गोरक्षा, लव जिहाद व अन्य कोणत्याही कारणाने निष्पाप मुस्लिम व्यक्तींची मॉबलीचिंगद्वारे भर रस्त्यावर हत्या केली जात आहे. यासह वक्फ बोर्डाच्या जमिनींवरील सर्व अतिक्रमणे दूर करण्यात यावीत, दलित व मुस्लिमांवरील जातीय, धार्मिक अत्याचाराच्या घटना रोखण्यात याव्यात, मुस्लिम समाजाला ऍट्रासिटी कायद्याचे संरक्षण या मागण्यांचे फलक आंदोलकांच्या हतामध्ये फलक आहेत. 

गोळीबार मैदानावरन निघालेला मुकमोर्चा सेव्हन लव्ह चौकातून उजवीकडे वळून सोनवणे हॉस्पिटल, रामोशी गेट, केईएम रुग्णायल, नरपतगिरी चौकातून पुन्हा उजवीकडे वळून जिल्हापरिषदेच्या जुन्या इमारतीसमोरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते साधू वासवणी चौक ते विधानभवनासमोर पोचणार आहे. 

मोर्चाच्या नियोजनासाठी सुमारे तीन हजार स्वयंसेवक राहणार आहेत. मोर्चामध्ये कोणत्याच घोषणा दिल्या जाणार नाहीत. मोर्चाच्या नेतृत्वात सर्वांत पुढे मुलींचा जथ्था राहणार असून, त्यानंतर महिला, ज्येष्ठ नागरिक, तरुणानंतर राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि नेते आहेत.