होमपेज › Pune › पिंपरी : पूर्ववैमनस्यातून टोळक्याकडून एकाचा खून

पिंपरी : पूर्ववैमनस्यातून टोळक्याकडून एकाचा खून

Published On: May 30 2018 9:15AM | Last Updated: May 30 2018 9:15AMपिंपरी : प्रतिनिधी 

पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन टोळक्याने धारधार हत्याराने वार करून एकाचा निर्घृणपणे खून केला. हा प्रकार चिंचवड पोलिस चौकी समोर मंगळवारी रात्री साडेबाराच्या सुमारास घडला.

आकाश लांडगे (20, रा. चिंचवडगाव) याचा खून झाला आहे. तर रणजीत चव्हाण, बाबा मोरे व त्यांच्या साथीदारांनी हा प्रकार केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आकाश, रणजीत व इतरांमध्ये पूर्वीची भांडणे होती. मंगळवारी रात्री तो चाफेकर चौकातून जात होता. त्यावेळी त्याच्या दुचाकीमधील पेट्रोल संपले. तो पेट्रोल घेऊन आला. 

पेट्रोल भरून तिथून निघणार तोच दुचाकीवरून आलेल्यांनी त्याच्यावर कोयता, लोखंडी रॉड व सीमेंटच्या गट्ट्याने हल्ला केला. यात आकाश गंभीर जखमी झाला. याप्रकारानंतर त्याला रुग्णालयात नेले मात्र, त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता.

चिंचवड पोलिस चौकीच्या समोर आणि पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर हा प्रकार घडला. यावरुन गुन्हेगारांचे मनोबल किती वाढले आहे याचा अंदाज येतो. यातील रणजीत याच्यावर अनेक गुन्हे दाखल असून तो सराईत आहे. पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.