Fri, Apr 26, 2019 09:51होमपेज › Pune › लोखंडी खांबावर डोके आदळून महिलेचा खून  

लोखंडी खांबावर डोके आदळून महिलेचा खून  

Published On: Mar 08 2018 1:20AM | Last Updated: Mar 08 2018 12:53AMपुणे : प्रतिनिधी 

मुलीला मारहाण केल्याचा जाब विचारण्यास गेलेल्या महिलेचे डोके लोखंडी खांबावर आणि भिंतीवर आपटून तिचा खून करणार्‍या  महिलेला येरवडा पोलिसांनी अटक केली. तिला न्यायालयात हजर करण्यात आले असता 10 मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. 

बिना सुनील राठोड (40, रा. गणेशनगर, येरवडा) असे पोलिस कोठडी झालेल्या महिलेचे नाव आहे. सारिका सुनील राठोड (38, रा. कामराजनगर, येरवडा) यांच्या खुनाबाबत पूनम संजय चव्हाण (28, रा. कामराजनगर, येरवडा) यांनी फिर्याद दिली आहे. दि. 6 मार्च रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास गणेशनगर येथे हा प्रकार घडला. सारिका यांचा पती सुनील याचे बिना राठोड हिच्याबरोबर अनैतिक संबध होते. याच कारणावरून दोघींमध्ये वारंवार भांडणे होत होती. सारिका या बाहेर गेल्या असताना त्यांच्या मुलीला आरोपी बिना हिने शिवीगाळ करून मारहाण केली होती. 

घरी आल्यानंतर त्यांना ही बाब समजल्यानंतर याबाबत विचारणा करण्यासाठी गेलेल्या सारिका यांनाच बिनाने मारहाण केली. तसेच  सारिका यांचे डोके गणेशनगर येथील बोळामधील लोखंडी खांबावर  व भिंतीवर आपटून खून केला. गुन्ह्याचा अधिक तपास करण्यासाठी बिनाला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. सरकारी वकील वामन कोळी यांनी याप्रकरणी पोलिस कोठडीची मागणी केली असता न्यायालयाने ती मंजूर केली.