Thu, Aug 22, 2019 12:33होमपेज › Pune › वृद्ध आई वडिलांचा खून करून निर्दयी पराग निवांत झोपला...

वृद्ध आई वडिलांचा खून करून निर्दयी पराग निवांत झोपला...

Published On: Dec 07 2017 1:24AM | Last Updated: Dec 07 2017 8:00AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

पुण्यातील शनिवार पेठेत राहणार्‍या कुटुंबातील उच्चशिक्षित मुलाने वृद्ध आई-वडिलांची झोपेत निर्घृण हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार बुधवारी सकाळी उघडकीस आला. त्याने निद्राधीन वडिलांवर चाकूने सपासप वार केले. तर, आईचाही दोरीने गळा आवळून खून केला. घरात लहान भाऊ आणि त्याची पत्नी असताना हा प्रकार तीन तासांनी समोर आला. दरम्यान, आरोपी पराग प्रकाश क्षीरसागर  मनोरुग्ण असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. आरोपी पराग जखमी असून, त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

प्रकाश दत्तात्रय क्षीरसागर (60, शनिवार पेठ) आणि आशा प्रकाश क्षीरसागर (55) अशी या वृद्धांची नावे आहेत. पोलिसांनी त्यांचा मुलगा आरोपी पराग (30) याला ताब्यात घेऊन उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले आहे. प्रतीक क्षीरसागर (30) यांनी फिर्याद दिली आहे. 

खून करून निर्दयी पराग निवांत झोपला...

वडिलांवर चाकूने सपा-सप वार आणि आईचा गळा आवळून खून केलेल्या परागचे हात, चेहरा तसेच छाती रक्ताने माखली होती. त्याही अवस्थेत तो खून केल्यानंतर हॉलमधील सोप्यावर निवांत झोपला होता. तर, आई-वडील खोलीत रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. दरम्यान, हॉल आणि किचनमधील रक्ताचा सडा पाहिल्यानंतर शेजारी सुन्न झाले.  हा सर्व प्रकार परागची वहिनी उठल्यानंतर सकाळी नऊ वाजता समोर आला. 

पराग क्षीरसागर याचे इंजिनिअरिंगचे शिक्षण झाले आहे. परंतु, त्याला दारूचे व्यसन होते. त्यामुळे कायमच त्याचे कुटुंबीयांसोबत वाद होत असत. सोसायटीत राहणार्‍यांसाठी हे वाद नेहमीचे होते. त्यांना पराग आई-वडिलांशी भांडतो, याची कल्पना होती. दरम्यान, पराग मनोरुग्ण असून, त्याच्यावर उपचार सुरू असल्याचे त्याचा भाऊ प्रकाश याने पोलिसांना सांगितले आहे. 

परागला ‘सिक्युरिटी एजन्सी’ टाकायची होती. त्यासाठी तो गेल्या काही दिवसांपासून आई-वडिलांकडे पैसे मागत होता. मात्र, दारूचे व्यसन आणि डोक्यावरील परिणामामुळे त्याला घरचे पैसे देत नव्हते. त्यामुळे कायमच त्यांचे वाद होत होते. त्यातूनच त्यांने आई-वडिलांचा खून केला.

गोंधळ झाला होता, पण...

आई-वडिलांचा खून करताना परागचा आणि आई-वडिलांसोबत वादविवाद, गोंधळ झाला होता. पण, त्याचा भाऊ प्रतीक याने पराग रोजच गोंधळ घालतो म्हणून त्याकडे लक्ष दिले नाही. त्याने वेळीच पाहिले असते, तर ही दुर्दैवी घटना घडली नसती, असेच म्हणावे लागेल. दरम्यान, परागने नेमकी हत्या आधी कोणाची केली, हे पोलिसांनाही सांगता येत नाही. पराग आई-वडिलांच्या खोलीत गेला. त्याने चाकूने वडिलांवर वार केले आणि आईचा नायलॉनच्या दोरीने गळा आवळला. आधी हत्या आईची केली की, वडिलांची हे मात्र समजू शकलेले नाही. 

हा प्रकार सर्व प्रकार पहाटे चार ते सहा वाजण्याच्या दरम्यान झाला आहे. परागने आई-वडिलांची हत्या केली. त्यानंतर तो हॉलमधील सोफ्यावर निवांत झोपला. परागची वहिनी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास उठली. ती बेडरूममधून बाहेर आली. त्या वेळी पराग सोफ्यावर झोपला होता. पण, त्याचे हात आणि छाती रक्ताने माखली होती. तर, किचनमध्येही रक्त होते. त्यानंतर त्यांनी पती आणि शेजार्‍यांना सर्व घटना सांगितली. 

सोसायटीत भयाण शांतता

क्षीरसागर कुटुंबीय राहत असणारी पाठे हाईट्स बहुमजली इमारत आहे. याठिकाणी रहिवासी क्षीरसागर कुटुंबीयांना ओळखत होते. पण, क्षीरसागर कुटुंबीयांचे सोसायटीतील कोणाशीही बोलणे किंवा लोभ नव्हता. मात्र, त्यांच्या घरात सतत वाद होतात, याची कल्पना रहिवाशांना होती. गेल्या एक महिन्यांपासून त्यांच्या घरात वाद होत नसल्याचेही एका रहिवाशाने सांगितले. दरम्यान, या घटनेनंतर सोसाटीत शांतता पसरली होती. सर्वच लोक बाहेर येऊन उभे राहिले होते. तर, रस्त्यावरही पाहणार्‍यांची मोठी गर्दी होती.