Tue, Mar 19, 2019 03:29होमपेज › Pune › पुणे : फक्त २० रुपयांसाठी खून

पुणे : फक्त २० रुपयांसाठी खून

Published On: Jun 19 2018 1:26AM | Last Updated: Jun 19 2018 12:48AMपुणे : प्रतिनिधी

शहराच्या मध्यवस्थीत केटरिंग कामगाराचा खून केवळ 20 रुपयांसाठी घडल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. रिक्षा प्रवासानंतर भाडे देण्यावरून वाद झाल्यानंतर चालक व त्याच्या साथीदाराने जबर मारहाण केली. त्यात या कामगाराचा मृत्यू झाला होता. दरम्यान या मारहाणीचा व्हिडीओ सोमवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली. शनिवारी दुपारी ही घटना रविवार पेठेत घडली होती.

तानाजी धोंडिराम कोरके (वय 31, रा. मुळ. रा. निलंगा, जि. लातूर) असे खून झालेल्या या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी अतुल उर्फ ईश्‍वर दशरथ हराळे (वय 37) आणि रोहन ज्ञानेश्‍वर गोडसे (वय 26, रा. दोघेही रविवार पेठ) यांना अटक करण्यात आली आहे. 

तानाजी कोरके हे एका केटरिंग व्यावसायिकाकडे वाढपी म्हणून काम करत होते. शनिवारी दुपारी रविवार पेठेतील देवाजीबाबा चौकादरम्यान दोघांनी तानाजी यांना लाथा-बुक्क्यांनी जबर मारहाण केली. यात तानाजी गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर आरोपींनीच त्यांना खासगी रुग्णालयात नेले. परंतु, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर फरासखाना पोलिसांना माहिती याबाबत मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात रुग्णालयात घेऊन गेलेल्या रिक्षा चालकांनीच मारल्याचे समोर आले.

त्यानुसार या दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडे तपास करण्यात आला. त्यावेळी आरोपींच्या रिक्षातून तानाजी हे रविवार पेठेत आले होते. आरोपींनी 40 रुपये रिक्षा भाडे झाल्याचे सांगितले. परंतु, तानाजी यांनी 20 रुपये दिले. आरोपींनी आणखी 20 रुपये मागितले. मात्र, पैसे न दिल्याने त्यांच्यात वाद सुरू झाला. यावरून तानाजी यांना मारहाण केल्याचे समोर आले. दरम्यान मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली असून, केवळ 20 रुपयांसाठी खून झाल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.