होमपेज › Pune › सर्व्हिस टॅक्स भरायला महापालिका विसरली

सर्व्हिस टॅक्स भरायला महापालिका विसरली

Published On: Aug 23 2018 1:28AM | Last Updated: Aug 23 2018 12:05AMपुणे : प्रतिनिधी

महापालिका प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा आणखी एक नमुना समोर आला आहे.  2007 ते 2012 या पाच वर्षांचा सर्व्हिस टॅक्स भरायचा महापालिकेला विसर पडला असून, केंद्रिय जीएसटी भवनने फटकारल्यानंतर आता प्रशासनाला जाग आहे. त्यामुळे आता दंडासहित तब्बल 7 कोटी 61 लाख रुपयांचा सर्व्हिस टॅक्स भरावा लागणार असून, त्यासंबधीचा प्रस्ताव प्रशासनाने आयुक्तांसमोर मंजुरीसाठी ठेवला आहे. 

महापालिकेच्या विविध विभागांकडून दरवर्षी कोट्यावधी रुपयांची विकासकामे केली जातात. त्यानुसार प्रत्येक विभागाकडून केंद्र सरकारला सर्व्हिस टॅक्स भरणे बंधनकारक आहे. मात्र, महापालिकेला चक्क हा टॅक्स भरण्याचाच विसर पडला. केंद्राच्या जीएसटी भवनाने पालिकेला पत्र पाठविल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. पालिकेच्या तीन विभागांनी 2007 ते 2012 या पाच वर्षांचा सर्विस टॅक्स भरलेला नाही. त्यात आकाशचिन्ह विभाग, भुमीजिंदगी विभाग आणि वाहतुक नियोजन व प्रकल्प या तिन विभागांचा समावेश आहे. या तिनही विभागांची रक्कम जवळपास 12 ते 13 कोटी इतकी आहे. 

टॅक्स न भरल्याप्रकरणी जीएसटी कार्यालयाकडून महापालिकेवर ताशेरे ओढण्यात आले असून, पालिकेला आता दंडासहित टॅक्स ही रक्कम भरण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत प्रशासनाकडे विचारणा केली असता, वाहतुक नियोजन व प्रकल्प विभाग आणि आकाश चिन्ह विभाग यांचा टॅक्स भरण्यात आला असून, केवळ आकाश चिन्ह विभागाचा टॅक्स भरला गेला नसल्याचे सांगण्यात आले. आता हा दंड भरण्यासाठीच्या हालचाली प्रशासनाकडून सुरू करण्यात आल्या आहेत. त्यानुसार 7 कोटी 61 लाख 13 हजार 631 रुपये इतकी रक्कम दंडासहित भरावी लागणार आहे. त्यासंबधीचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला असून, मंजुरीसाठी आयुक्त सौरभ राव यांच्यासमोर ठेवण्यात आला आहे. या प्रकाराने तब्बल पावणेसहा हजार कोटींचे अंदाजपत्रक असलेल्या महापालिकेच्या हलगर्जीपणाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे एवढे मात्र नक्की.