Thu, Jun 20, 2019 20:42होमपेज › Pune › इतके का आमच्या शहरात सुविधांचे उणे!

इतके का आमच्या शहरात सुविधांचे उणे!

Published On: Aug 26 2018 1:29AM | Last Updated: Aug 26 2018 12:22AMपिंपरी : नंदकुमार सातुर्डेकर

केंद्र सरकारने राहण्यायोग्य शहरांची यादी जाहीर केली. या यादीत शहर 69 व्या क्रमांकावर गेले. यास  पालिका प्रशासन जबाबदार असल्याचे सांगत सत्ताधारी भाजपने हात झटकले.  तर विरोधकांनी भाजपवर हल्लाबोल केला. भाजपची सत्ता आल्यानंतर बेस्ट सिटीची वेस्ट सिटी झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केला. सेेेनेेेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शहरातील गुंडगिरी, नियोजनशून्य कारभार, भ्रष्टाचार पाहता राहण्यायोग्य शहरांच्या यादीत पिंपरी चिंचवडचा खालून पहिला नंबर यायला हवा होता,  अशी तिखट प्रतिक्रिया दिली. मात्र पीछेहाट होण्याइतके का या शहरात सुविधांचे उणे आहे? असा प्रश्न शहरवासीयांना पडला आहे.महासाधू मोरया गोसावी यांच्या पवित्र स्पर्शाने पावन झालेल्या  पिंपरी-  चिंचवडने स्वातंत्र्य चळवळीत  महत्वपूर्ण कामगिरी बजावली. 

स्वावलंबनाच्या आधारावर राष्ट्रीय पाठशाळा स्थापन झाली.  ती इथेच. चापेकर बंधूंसारख्या क्रांतिकारकांच्या बलिदानाची साक्ष देणारी ही भूमी एकेकाळी पुणे तिथे काय उणे ? असे म्हटले जायचे. मात्र पुण्याचे जुळे शहर अशी ओळख असणार्‍या पिंपरी-चिंचवडने कात टाकत केलेली प्रगती कौतुकास्पदच आहे. 

शहराची लोकसंख्या 21 लाखांवर पोचली असताना विकासाच्या दिशेने शहर धावते आहे. शहरात आज हिंदुस्तान अँटिबायोटिक्स, टाटा मोटर्स, एसकेएफ, थिसेनक्रुप यासारखे 6 हजाराहून अधिक उद्योग आहेत. या उद्योगांना वीज, पाणी, रस्ते यांसारख्या सुविधा देण्याकडे पालिकेने लक्ष पुरविले आहे. वाहन उद्योगांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी ऑटो क्लस्टर प्रकल्प राबवणारी पिंपरी पालिका देशातील पहिली महापालिका आहे. नागरिकांना पायाभूत सुविधा देण्यात पालिका अग्रेसर आहे. रस्ते हे शहराच्या रक्तवाहिन्या आहेत हे ओळखून रस्ते, भोसरी, चिंचवड, स्पाईन रोड, एम्पायर इस्टेट, नाशिक फाटा येथे उड्डाणपूल उभारण्यात आले आहेत. सार्वजनिक वाहतूक संस्था पीएमपीएमला मदतीचा हात दिला आहे. मेट्रोचे कामही वेगात सुरू आहे.

विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हावी, यासाठी पालिकेने सायन्स सेंटर साकारले आहे. पर्यावरण समतोलासाठी आजवर 22 लाख वृक्षारोपण केले आहे. 175 हून अधिक उद्याने विकसित केली आहेत. यातील   दुर्गादेवी उद्यान, भक्ती-शक्ती उद्यान, थेरगाव बोट क्लब, भोसरी सहल केंद्र, नक्षत्र वाटीका ही उद्याने तर या शहराला पडलेले जणू स्वप्न आहे.

पायाभूत सुविधामुळे मोठमोठे मॉल्स, हॉटेल्स, प्रख्यात ज्वेलर्स शहरात आले आहेत. हिंजवडी आयटी पार्क, महाविद्यालयीन शिक्षण देणार्‍या संस्था, यामुळे मोठमोठे निवासी प्रकल्प इथे उभे राहत आहेत. सांस्कृतिक विकासासाठी मराठी नाट्यपरिषद, कलारंग प्रतिष्ठान, कामगार साहित्य परिषद अशा संस्था धडपड करीत आहेत. पालिकेने चिंचवड, पिंपळे गुरव, संत तुकाराम नगर, भोसरी येथे प्रेक्षागृहांची उभारणी केल्याने रसिकांना विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा आस्वाद घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे.इतक्या सुविधा असताना राहण्यायोग्य शहरांच्या यादीत शहराची पीछेहाट का? असा प्रश्न शहरवासीयांना पडला आहे.