Fri, Jul 10, 2020 20:46होमपेज › Pune › अहवालासाठी ‘एमपीसीबी’ला हवा वेळ

अहवालासाठी ‘एमपीसीबी’ला हवा वेळ

Published On: Dec 02 2017 2:08AM | Last Updated: Dec 02 2017 1:52AM

बुकमार्क करा

पुणे ः प्रतिनिधी 

प्रक्रिया न करता सांडपाणी नदीपात्रात सोडले जात असल्यामुळे मुळा-मुठा नदीच्या  प्रदूषणात वाढ झाली आहे. प्रदूषण नेमके कोणत्या पातळीवर आहे, याचे नमुणे घेऊन या प्रदूषणाचा दूरगामी काय परिणाम होणार याचा सविस्तर अहवाल सादर करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी)  राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडे (एनजीटी) वेळ मागितला आहे.    
पर्यावरणप्रेमी कार्यकर्ते सुभाष रामकृष्ण पाटील यांनी अ‍ॅड. विलास महाजन यांच्या मार्फत राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात याचिका दाखल केली आहे. याचिकेमध्ये महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी), केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (सीपीसीबी), पुणे महानगर पालिका, केंद्रीय पर्यावरण मंत्रालय आणि वन विभाग (वातावरण बदल) (एमओईएफसीसी) आदींना प्रतिवादी करण्यात आले आहे.

पुण्यातील विविध मोठ्या बांधकाम  प्रकल्पात, मॉलमध्ये, रूग्णालयात सांडपाण्यावर प्रक्रिया करून पाणी नदीत सोडले जात नाही. त्यामुळे मुळा -मुठा नदीच्या प्रदूषणात प्रचंड वाढ झाली आहे. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) प्रकल्प 2022 पर्यंत पूर्णपणे कार्यान्वित होतील असे पालिकेचे म्हणणे आहे. परंतु, तोपर्यंत प्रदूषण होतच राहणार आहे. या नद्यांमध्ये होणारे प्रदूषण रोखावे, सांडपाण्यावर 100 टक्के प्रक्रिया करावी अशी मागणी याचिकेच्या माध्यमातून करण्यात आली आहे. 

याचिकेच्या अनुषंगाने एनजीटीने पालिका आणि एमपीसीबीला मिळून एक पुण्यातील एसटीपी प्रकल्पाचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार एमपीसीबीने 189 प्रकल्पांची पाहणी करून त्यातील 30 प्रकल्पांतील एसटीपी प्रकल्प योग्यरितीने कार्यान्वित होत नसल्याबाबतचा अहवाल एनजीटीकडे सादर केला होता. त्यावर न्यायाधिकरणाचे न्या. यु. डी. साळवी आणि न्या. डॉ. नगीन नंदा यांच्या खंडपीठाने 30 प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश एमपीसीबीला दिले होते. मुळा-मुठा नदीचे प्रदूषण कोणत्या पातळीवर आहे. याचे नमुणे घेऊन या प्रदूषणाचा दूरगामी काय परिणाम होणार याचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश एनजीटीने दिले होते. त्यावर एमपीसीबीने आता वेळ मागितला आहे. याचिकेवरील पुढील सुनावणी 8 डिसेंबर रोजी होणार आहे.