होमपेज › Pune › ‘सैराट’फेम मंजुळेंचा सेट विद्यापीठच हटविणार

‘सैराट’फेम मंजुळेंचा सेट विद्यापीठच हटविणार

Published On: May 01 2018 1:22AM | Last Updated: May 01 2018 12:18AMपुणे : प्रतिनिधी 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मैदानावर दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी त्यांच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी उभारलेला सेट काढण्यासाठी प्रसंगी जेसीबी लावा, अशा स्पष्ट सूचना उच्च शिक्षण विभागाने विद्यापीठाला दिल्या होत्या. त्यावर विद्यापीठाने मैदानात उभारलेला सेट स्वतःहून हटविण्याचे काम सुरू केले असून, सेट हटविण्यासाठी येणारा खर्च दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्याकडून वसूल करण्यात येणार असल्याची माहिती विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. अरविंद शाळीग्राम यांनी दिली. 

दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी त्यांच्या आगामी फुटबॉलवर आधारित चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी विद्यापीठाच्या मैदानात सेट उभारला. दरम्यान, विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे हित बाजूला सारून मैदानावर सेट उभारल्याप्रकरणी विद्यार्थी संघटनांनी आक्रमक होत विद्यापीठ प्रशासनाला धारेवर धरले होते. दरम्यान, विद्यापीठाने सेट लावण्यासाठी राज्य सरकार आणि उच्च शिक्षण संचालनालय यांची परवानगी घेतली नसल्याचे समोर आले होते. त्यावर उच्च शिक्षण विभागाने सेट हटविण्याची कार्यवाही करण्याचे आदेश विद्यापीठ प्रशासनाला दिले होते; तसेच याप्रकरणी पुणे शहर तहसील कार्यालयाने विद्यापीठावर शर्त भंग केल्याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठविला तर, उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी सेट काढण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर विद्यापीठाने मंजुळे यांना सेट काढण्याबाबत दोन नोटिसा पाठविल्या होत्या; मात्र त्यानंतरही सेट जैसे-थे होता. 

विद्यापीठाच्या मैदानावर मंजुळे यांनी गेल्या 7 महिन्यांपासून चित्रपटाच्या शूटिंगसाठी सेट लावला आहे. विद्यापीठाद्वारे मंजुळे यांना सेट हटविण्याच्या वारंवार सूचना देण्यात आल्या. मात्र, त्यानंतरही सेट हटविला जात नसल्याने विद्यापीठाने मंजुळे यांना कायदेशीर कारवाईचा इशारा दिला. त्यावर मंजुळे यांनी आपण सेट काढून घेत असल्याचे पत्र विद्यापीठ प्रशासनाला देत सेट काढायला सुरुवात केली. मात्र, त्यानंतर दीड महिना उलटला तरी चित्रपटाचा सेट अत्यंत धिम्या गतीने काढणे सुरू होते. त्यावर वेळ पडल्यास जेसीबी लावून सेट काढण्याच्या सूचना राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने यांनी गेल्या आठवड्यात विद्यापीठ प्रशासनाला दिल्या होत्या. 

त्यावर विद्यापीठाने तत्काळ कार्यवाही सुरू करत मैदानात उभारण्यात आलेला सेट हटविण्यास सुरुवात केली आहे. गेल्या पाच दिवसापासून विद्यापीठातील सेट हटविण्याचे काम सुरू असून, काही दिवसातच विद्यापीठातील मैदान खेळण्यासाठी उपलब्ध होणार आहे. सेट हटविण्यासाठी येणारा खर्च नागराज मंजुळे यांच्याकडून वसूल केला जाणार असल्याची माहिती विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. अरविंद शाळीग्राम यांनी दिली. 

Tags : Pune, movie, set, removed, university