Wed, Jul 24, 2019 12:50होमपेज › Pune › महापौर, पक्षनेते बदलाच्या हालचाली सुरू

महापौर, पक्षनेते बदलाच्या हालचाली सुरू

Published On: Jun 02 2018 2:03AM | Last Updated: Jun 02 2018 12:57AMपिंपरी : जयंत जाधव 

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील महापौर नितीन काळजे व सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांना बदलण्याच्या हालचाली भारतीय जनता पक्षाच्या अंतर्गत सुरू झाल्या आहेत. त्यादृष्टीने हालचालींनी वेग घेतला असून, याबाबत येत्या आठवड्यात मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्यासोबत शहरातील भाजपच्या ‘कोअर कमिटी’ची बैठक होणार असल्याचे विश्‍वसनीयरीत्या समजते. 

पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपची सत्ता एकहाती आल्यानंतर पहिल्याच वर्षी आ. लांडगे गटाचे व शहराच्या ग्रामीण भागातील नितीन काळजे यांची अनपेक्षितपणे वर्णी लागली. यामध्ये आ. लांडगे यांचे ऐनवेळचे धक्कातंत्र उपयोगी पडले होते; परंतु मागील आठवड्यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील सर्वच महापालिकेतील भाजपचे महापौर बदलणार असल्याचे जाहीर केले होते.   
दरम्यान, महापौर व पक्षनेते बदलाबाबत मागील काही दिवसांपूर्वी आ. जगताप व आ. लांडगे यांची मुख्यमंत्र्यांसमवेत प्राथमिक चर्चा झाली होती. त्यानंतर याबाबत भाजप शहर  ‘कोअर कमिटी’सोबत मुख्यमंत्र्यांनी दि. 21 मे रोजी मुंबईत बैठक ठेवली होती. परंतु; पालघर लोकसभेच्या प्रचारसभेमुळे मुख्यमंत्र्यांनी ती बैठक पुढे ढकलली. त्यामुळे येत्या आठवड्यात याबाबत बैठक होण्याची शक्यता भाजपच्या वर्तुळातून व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे भाजपमधील विविध गटांमध्ये हालचालींना वेग आला आहे.     

महापौरपद इतर मागासवर्गीय संवर्गासाठी अडीच वर्षांसाठी राखीव असले तरी सव्वा-सव्वा वर्षांसाठी दोन महापौर करण्याची शक्यता आहे. महापौरपदासाठी आ. लांडगे गटाचे नगरसेवक राहुल जाधव, संतोष लोंढे व आ. जगताप गटाचे नगरसेवक शत्रुघ्न काटे इच्छुक आहेत; तर आ. जगताप यांचे निकटवर्तीय नगरसेवक तुषार कामठे व शशिकांत कदम यांच्या नावाचीही चर्चा आहे.

आ. जगताप यांना चिंचवड विधानसभा मतदारसंघात 2014 च्या निवडणुकीत पिंपळे सौदागर भागातून 5 हजारांचे मताधिक्य होते. यामध्ये शत्रुघ्न काटे यांचे मोठे योगदान होते. काटे हे आ. जगताप यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. त्यामुळे महापौर बदल झाल्यास काटे यांचे नाव पुढे येण्याची शक्यता आहेे. तर आ. लांडगे गटाकडून इतर मागासवर्गीयांची मते मिळवण्यासाठी राहुल जाधव किंवा संतोष लोंढे यांची वर्णी लागण्याची  शक्यता आहे.     

दरम्यान, पक्षनेतेपदाबाबत जुने निष्ठावंत असल्याने एकनाथ पवार यांची वर्णी पहिल्याच वर्षी लागली होती; परंतु त्यांनी केलेला मनमानी कारभार व पक्षातील गटबाजी त्यांना मारक ठरलेली आहे. त्यांच्या कारभाराबाबत दोन्ही आमदारांची व पक्षातील नगरसेवकांची नाराजी असल्याने त्यांना पाच वर्षे होणयापूर्वीच हटविण्याबाबत हालचालींनी वेग घेतला आहे.