होमपेज › Pune › ‘इंद्रायणी’काठी लोटला वैष्णवांचा सागर 

‘इंद्रायणी’काठी लोटला वैष्णवांचा सागर 

Published On: Jul 06 2018 1:34AM | Last Updated: Jul 06 2018 12:43AMआळंदी : श्रीकांत बोरावके

खेळ मांडियेला वाळवंटी घाई । नाचती वैष्णव भाई रे।
क्रोध अभिमान गेला पावटणी । 
एक एका लागतील पायी रे ॥
गोपीचंदन उटी तुळसीच्या माळा। 
हार मिरविती गळा ।
टाळ मृदुंग घाई पुष्प वर्षाव । 
अनुपम्य सुखसोंहळा रे ॥

टाळ-मृदंगाचा टिपेला पोहोचलेला भक्तिकल्लोळ, माउली-माउली असा अखंड जयघोष... वैष्णवांच्या मेळ्याने बहरून आलेला इंद्रायणीचा काठ... माउलींच्या दर्शनासाठी लागलेल्या लांबच लांब रांगा... अशा वातावरणाने गुरुवारी अलंकापुरी दुमदुमून गेली. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पायी वारी पालखी सोहळ्याचे शुक्रवारी (दि. 6) प्रस्थान होणार असून, त्याच्या पूर्वसंध्येला मराठवाडा, विदर्भ, खान्देश, पश्चिम महाराष्ट्र, कोकणातून गुरुवारी (दि. 5) आळंदीमध्ये 300 पेक्षा अधिक दिंड्या आळंदीत दाखल झाल्या आहेत. दोन दिवसांमध्ये दाखल झालेल्या दिंड्यांचा आकडा 500 पेक्षा अधिक झाला आहे. परंतु यंदा गर्दी कमी असून प्रस्थानच्या पूर्वसंध्येला रस्ते मोकळे दिसत आहेत.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पायी वारी पालखी प्रस्थान  सोहळा भक्ती पर्वणीचा योग साधण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने आळंदीत दाखल झाले. इंद्रायणी घाटावर त्यांनी फुगडीचा फेर धरला तर काहींनी टाळ मृदूंगाच्या गजरात देहभान विसरून नाचण्याचा आनंद लुटला. पहाटेपासूनच वारकर्‍यांच्या राहुट्या व धर्मशाळांमधून अभंगाच्या सुरावटी निघू लागल्या आहेत. टाळ- मृदंगाचा गजराने आसमंत भरून गेला असून स्नानासाठी इंद्रायणीच्या तीरावर वारकर्‍यांची गर्दी होऊ लागली आहे. पाऊस बरसत असून  इंद्रायणीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. यामुळे पाण्याप्रमाणे भाविकांची भक्तीही जणू दुथडी भरून वाहत होती. स्नानानंतर माउलींच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी दर्शनबारी पूर्णपणे भरून गेली होती.यंदाच्या सोहळ्यासाठी हजारो वारकरी आळंदीत दाखल झाले आहेत. त्यांच्यासाठी आळंदी पालिका व जिल्हा प्रशासनाकडून विविध सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यंदा वारीमध्ये स्वच्छता व व्यसनमुक्तीचा संदेशही देण्यात येत आहे.पाऊस लांबल्याने वारकर्‍यांची संख्या काहीशी घटल्याचे दिसून येत आहे.