होमपेज › Pune › पुणे : मुळशीच्या भगवान चावलेकडून एव्हरेस्ट शिखराला गवसणी

पुणे : मुळशीच्या भगवान चावलेकडून एव्हरेस्ट शिखराला गवसणी

Published On: May 17 2018 1:00PM | Last Updated: May 17 2018 1:00PMपुणे : प्रतिनिधी

पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील भगवान चावले वैयक्तिक यांनी गुरुवारी सकाळी ८.३० वाजता एव्हरेस्ट सर केले आहे. त्यांच्या बरोबर सातारा जिल्ह्यातील लोणंद येथील प्रजित परदेशी यांनीही हे शिखर पादाक्रांत केले आहे.
अलका चौकातील एलआयसीच्या मुख्य इमारतीमध्ये जिल्हा अधिकारी (डिओ) या पदावर ते कार्यरत आहेत. मागच्या वर्षी २०१७ मध्ये भगवान चावले हे एव्हरेस्ट शिखर चढाईस गेले होते. या दरम्यान, दि. २३ मे या दिवशी केवळ शंभर मीटर समीटसाठी बाकी असताना हिलरी स्टेप्सच्या खालुन वादळी वार्‍यामुळे त्यांना माघारी फिरावे लागले. गेल्या तीन वर्षापासून मेहनत घेत होते. अखेर त्यांना या यशाचे फळ मिळाले आहे. चावले यांनी गिरीप्रेमीच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या साहित्यांनी हे शिखर पादाक्रांत केले आहे. 

याबाबत बोलताना चावले म्हणाले की, गेल्या वर्षी केवळ थोडक्यात माझे एव्हरेस्ट शिखर हुकले होते. तो दिवस मी विसरु शकणार नाही. परंतु मी तीन वर्षापासून जी मेहनत घेत होतो, त्या मेहनतीचे फळ मिळण्यास एक वर्ष अजून मला वाट पहावी लागणार होती. डोळे पाणावले पण ह्दयावर दगड ठेवून परत फिरलो. पण मी हरलो नव्हतो, त्याच वेळी चोमोलुंगमा (एव्हरेस्ट) देवतेला वचन दिले हा मावळा परत येणार तुझ्या भेटीला. पुढच्या वेळेस तुझी जबाबदारी वाढलेली असेल, तुला दर्शन द्यावेच लागेल. या वर्षी मी पुन्हा ते स्वप्न पुर्ण करण्यासाठी एव्हरेस्ट मोहिमेवर गेलो. कॅम्प तीन पर्यंतचा सर्व प्रवास रोटेशन्स प्रमाणे रोटेशन्स खुप चांगले झालेत. दि. १३ मे रोजी बेस कॅम्पवरुन समीटसाठी रवाना झाले. दि. १६ मे रोजी कॅम्प चार येथील साऊथ कोल वरुन मुख्य समीटकडे कुच करण्यात आली. आणि दि. १७ मे रोजी सकाळी ८.३० वाजता  एव्हरेस्ट शिखरावर तिरंगा फडकविला.