Sun, May 26, 2019 16:39होमपेज › Pune › पतंगाचा मांजा जीवघेणाच

पतंगाचा मांजा जीवघेणाच

Published On: Jan 12 2018 1:56AM | Last Updated: Jan 11 2018 10:37PM

बुकमार्क करा
पिंपरी : प्रतिनिधी

संक्रात जवळ आल्याने  शहरात  आता  पतंग उडविण्यास सुरवात झाली आहे. संक्रांतीचा आनंद लुटण्यासाठी केली जाणारी पतंगबाजी आता जीवावर बेतत आहे. कापलेल्या पतंगाच्या मांज्याने दुचाकीवर जाणार्‍या चिमुरड्याला डोळयाला गंभीर इजा झाल्याची घटना नुकतीच (दि.9) काळेवाडीतील राजवाडेनगर येथे घडली. यापूर्वीही पतंगाच्या नायलॉनच्या मांज्यामुळे अनेकजण जखमी झाले आहेत. तर काहींना जीव गमवावा लागला आहे. काळेवाडी येथील घटनेमुळे पुन्हा एकदा मांजाबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले असून नायलॉनचा मांजा हा धोकादायकच असून त्यावर बंदी आणावी अशी मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे. 

शहरातील पक्षीमित्रांना मांज्यामुळे जखमी झालेल्या प्राणी पक्ष्यांना वाचवण्यासाठी जीवाचे रान करावे लागत आहे. दर महिन्याला नायलॉनच्या मांज्यामुळे कमीत कमी चाळीस ते पन्नास पक्षी व प्राणी जखमी होतात. बर्‍याचदा झाडांवर पक्ष्यांना सोडवण्यास गेलेल्यांनाही मांज्या न दिसल्याने ते जखमी झाले आहेत. चर्‍होली, मोशी, आळंदी, पिंपरी, चिंचवड व निगडी यांसह विविध भागात मांज्यामुळे पक्षी दगावण्याचे प्रमाण अधिक असल्याची माहीती पक्षीप्रेमींनी दिली.  

नायलॉन मांजा हा नायलॉन धाग्यापासून तयार करण्यात येत असून त्यावर रासायनिक प्रक्रिया करुन अत्यंत मजबूत बनविला जातो. नायलॉन मांजाच्या वापरामुळे शहरातील बर्‍याच नागरिकांना गंभीर स्वरुपाच्या जखमा झाल्या आहेत. डोळ्यांना इजा होणे, गळा कापणे, चेहरा विद्रुप होणे, नाक, कान व गालावर गंभीर जखमा यांसह दुचाकी वाहनचालक नायलॉन मांजात अडकून गंभीर अपघातात बळी पडल्याच्या घटना घडल्या आहेत. 

राजस्थान सरकारच्या वतीने संक्रांतीच्या काळात 12 ते 15 जानेवारी दरम्यान दरवर्षी फ्री बर्ड ट्रीटमेन्ट कॅम्प व रेस्क्यू सेंटर स्थापण्यात येते. यावेळी लव्ह बर्डस, नॉट काईटस, हेल्प द बर्डस अशा प्रकारचे जनजागृतीपर संदेश देण्यात येत असून महाराष्ट्रात अशाप्रकारचे उपक्रम कधी राबवण्यात येतील अशी विचारणा पर्यावरण प्रेमींनी केली आहे. तसेच विरोध हा पतंग उडवण्याला नसून नायलॉन मांज्याच्या वापराला आहे. त्यामुळे सावधगिरीने पतंग उडवण्याचा आऩंद घ्यावा असे  आवाहन पर्यावरणप्रेमींनी केले आहे. 

कायदयाची अंमलबजावणी नाही

राज्य शासनाने याबाबत जनजागृती विषयक कार्यक्रम हाती घेण्यासाठी पर्यावरण अधिनियम 1986चे कलम 5 अन्वये निर्देश दिले आहेत. नाशिकसह राज्यातील अनेक शहरात नायलॉन मांजावर बंदी आहे. शहरात मात्र खुलेआम विक्री होत असून विक्रेत्यांवर कारवाई होत नाही. संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवण्याचा ट्रेंड पाहता विद्युत वाहिन्यांजवळ पतंग उडवणे जीवावर बेतू शकते, असा इशारा देण्यात आला आहे. मांजामुळे अपघात घडल्यास वीज पारेषण यंत्रणेला ब्रेकडाऊनचा धोका होऊ शकतो तसेच ग्रीड कोसळण्याचीही वेळ येऊ शकते, अशी महत्त्वपूर्ण माहिती सध्या सोशल मिडीयावर फिरत आहे.