Wed, Apr 24, 2019 08:16होमपेज › Pune › पक्ष बांधणीत मनसेचे रेल्वे इंजिन घसरले

पक्ष बांधणीत मनसेचे रेल्वे इंजिन घसरले

Published On: Jul 08 2018 1:45AM | Last Updated: Jul 08 2018 12:41AMपिंपरी : प्रदीप लोखंडे

स्थानिक प्रश्‍नांकडे होणारे दुर्लक्ष, पक्षांतर्गत पदाधिकार्‍यांची नाराजी, पक्षबांधणी करण्यासाठी नियोजनाचा अभाव असणे या कारणांमुळे शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पिछाडी होत आहे. पक्षाची सध्याची अवस्था पाहता नवीन कार्यकर्तेही पक्षामध्ये प्रवेश करत नाहीत. त्यामुळे शहरात पक्ष बांधणीत मनसेचे रेल्वे इंजिन घसरले असल्याचे चित्र आहे. स्थानिक प्रश्‍नांच्या पाठपुराव्याचा प्रयत्न कमी पडत असल्यामुळे जनतेतूनही मनसेला पसंती मिळत नसल्याची अवस्था आहे.   

महापालिकेच्या 2012 च्या निवडणूकीत मनसेचे एकूण चार नगरसेवक पहिल्याच प्रयत्नात निवडून आले होते. अश्‍विनी चिखले, राहुल जाधव, अनंत कोर्‍हाळे व मंगेश खांडेकर हे चार जण त्यावेळी निवडून आले. 2017 च्या निवडणूकीमध्ये तीघांचा पराभव झाला असून सचिन चिखलेंच्या रुपाने केवळ एकाच जनगरसेवकावर पक्षाला समाधान मानावे लागले आहे. सध्या शहराध्यक्ष सचिन चिखले हेच महापालिकेत पक्षाची धुरा सांभाळत आहेत. 

पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी चिखले यांच्याकडे शहराध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे. परंतु; त्यांच्या शिवाय अन्य सक्षम पर्यायही पक्षाकडे नाही, ही सध्दा वस्तूस्थिती नाकारता येत नाही. शहरातील उपविभागीय पदांचे नुकतेच वाटप करण्यात आले. हे वाटप करतानाही बराच विलंब लागला. प्रभागांनुसार शाखाअध्यक्षांसारख्या पदांचे अद्यापही वाटप करण्यात आले नाही. त्यामुळे पक्षातील कार्यकर्ते नाराजीचा सुर काढत आहेत. पदांचे वाटप लवकर होत नसल्यामुळे कार्यकर्तेही थंडावले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी प्रभारी नियुक्त्या करण्यात आल्या. मात्र सध्या नेमण्यात आलेले प्रभारी शहरात एकदाही फिरकलेले नसल्याची तक्रार पदाधिकारी करत आहेत. त्यामुळे कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांना आपले गार्‍हाणे मांडण्यासाठी मुंबईला हेलपाटे मारावे लागत आहेत. 

सध्या मनसेच्या वतीने शहरात इंग्रजीऐवजी मराठी पाट्या लावणे, महापालिकेचे कामकाज मराठीतून करणे, विविध ठिकाणांचे तिकिट दर मराठीतून करावे, मल्टिप्लेक्स थिएटरमध्ये खाद्य पदार्थांचे दर कमी करा आदी मागण्यांसाठी वारंवार आंदोलन छेडण्यात येत आहे. हे आंदोलन करताना त्यांच्याकडे कार्यकर्त्यांचे पुरेसे मनुष्यबळ दिसत नाही. 

मनसेच्या शहरातील नेतृत्त्वाकडे स्थानिक प्रश्‍नांविषयी जाण असूनही नियोजनाचा अभाव नसल्याचे दिसते. शहरवासीय कचर्‍याच्या समस्यांनी त्रस्त आहेत. या बरोबरच पाण्याचा अपुरा पुरवठा, खड्ड्यांच्या समस्या, मेट्रोमुळे शहरातील पुणे-मुंबई या 80 फुटी रस्त्याचे होणारे अरुंदीकरण व त्यामुळे होणारे वाहतुकीच्या समस्या,  महापालिकांच्या योजनांचा नागरिकांना फायदा होत नाही. आरटीई प्रवेशात संस्था चालक व प्रशासकीय अधिकार्‍यांच्या संगमनताने गरीब विद्यार्थ्यांचे रखडले जाणारे प्रवेश अशा अनेक प्रश्‍नांवर मनसेचे खळ खट्ट्याक होताना दिसत नाही.

महापालिकेतही एकच नगरसेवक असल्यामुळे त्यांचा आवाज घुमताना दिसत नाही. त्यामुळे शहरात स्थानिक प्रश्‍नांना मनसेने स्थान देणे गरजेचे आहे. त्या विषयी आवाज उठवून प्रश्‍नांना न्याय देण्यासाठी आंदोलने घ्यायला हवे. यासह पक्ष वाढवायचा असेल तर पक्ष बांधणीकडे लक्ष देणे गरजेचे आहे.