Tue, Apr 23, 2019 01:48होमपेज › Pune › पुणे : ११ दिवसांपासून बेपत्ता तरूण सिंहगडाच्या पायथ्याशी सापडला

पुणे : ११ दिवसांपासून बेपत्ता तरूण सिंहगडाच्या पायथ्याशी सापडला

Published On: Jul 01 2018 10:21PM | Last Updated: Jul 01 2018 10:21PMपुणे : हिरा सरवदे

महाविद्यालयाचा अर्ज भरण्यासाठी घरातून बाहेर पडलेला तरूण पुन्हा घरी न आल्याने तो बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या वडिलांनी दाखल केली होती. शोध घेऊनही गेली ११ दिवसापासून मुलगा सापडत नसल्याने हतबल झालेल्या आई - वडिलांना 'तुमचा मुलगा सिंहगडाच्या पायथ्याशी जखमी आवस्थेत  सापडला असून को सुखरुप आहे', असा फोन येताच त्यांना आनंदाश्रू आवरता आले नाहीत. दरम्यान, जखमी तरूणास झोळीतून बाहेर काढून दवाखण्यात दाखल करणाऱ्या आतकरवाडीतील नागरिकांच्या संनेदनशीलतेचे कौतुक होत आहे.

फुलचंद कांबळे (रा. उत्तमनगर, शिवणे, मूळ देवी हल्लाळी, ता. निलंगा, जि. लातूर) हे एनडीएमध्ये नोकरी करतात. त्यांचा मुलगा अनिल कांबळे (वय २२) हा माळवाडी येथील एका महाविद्यालयात कला शाखेच्या पहिल्या वर्षी उत्तीर्ण झाला असून दुसऱ्या वर्षाचा अर्ज भरण्यासाठी तो १९ जून रोजी सकाळी घराबाहेर पडला होता. त्यानंतर तो घरी परत न आल्याने फुलचंद कांबळे यांनी अनिल बेपत्ता झाल्याची तक्रार उत्तमनगर पोलिस चौकीत दाखल केली होती. तेव्हापासून पोलिस आणि कांबळे कुटुंबीय अनिलचा शोध घेत होते. मात्र त्याचा ठाव ठिकाणा लागत नसल्याने कांबळे कुटुंबीय हतबल झाले होते. अनिलचे मित्रही त्याचा शोध घेऊन विचारपुस करत होते.

भाऊसाहेब सांगळे (रा. सिंहगड पायथा, आतकरवाडी) हे लाकडी गोळा करण्यासाठी रविवारी सकाळी सिंहगड पायथ्याला असलेल्या मोठी दरी या ठिकाणी गेले असता एक तरूण बेशुध्द अवस्थेत असलेला दिसला. त्यांनी तो जिवंत आहे का? हे पाहून तो जिवंत असल्याची खात्री  पटताच गावातील जयभवानी तरूण मंडळाच्या कार्यकर्त्यांना याबाबत फोनवरून माहिती दिली. मंडळाचे कार्यकर्ते आणि उपसरपंच किसन  पढेर, योगेश सांगळे, महेश सांबरे, सचिन पढेर, सुरज कुभारकर, दत्ता सांगळे, योगेश पढेर, ओंकार भाडळे, सुरज पन्हाळकर, सागर पन्हाळकर, संदीप भोंडेकर, भानुदास सांबरे, रविंद्र कांबळे, अक्षय पांढरे हे पाण्याची बाटली, बिस्कीट पुडे, झोळी आदी साहित्य घेऊन घटनास्थळ गाठले. तेथे गेल्यानंतर या कार्यकर्त्यांनी अनिलला पाणी पाजून बिस्कीटे खाऊ घातली. त्यानंतर या लोकांनी त्याला झोळी करून गावात आणले. जखमी तरूणामध्ये मोठ्या प्रमाणात अशक्तपणा जाणवल्याने त्याला खडकवासला येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. 

हा तरूण थोडाफार शुध्दीवर आल्यानंतर त्याला नाव विचारता अनिल कांबळे असल्याचे सांगितले. तसेच कुटुंबासंदर्भातही माहिती घेऊन त्याचे वडील फुलचंद कांबळे यांना फोन करून अनिल सिंहगड पायथ्याशी जखमी आवस्थेत सापडल्याची आणि त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती दिली. हे शब्द ऐकताच शोध घेऊनही गेल्या आकरा दिवसापासून मुलगा सापडत नसल्याने हतबल झालेल्या आई - वडिलांना आनंदाश्रू आवरले नाहीत. कांबळे यांनी रुग्णालयात येऊन मुलास विचारपुस करण्याचा प्रयत्न केला मात्र, त्याच्याकडून म्हणावा तेवढा प्रतिसाद मिळू शकला नाही. सध्या अनिलवर उपचार सुरू असून तो त्या दरीत कसा गेला, याबाबतची स्पष्टता अद्याप तरी झालेली नाही. जे सत्य असेल ते अनिल पूर्णपणे बरा झाल्यानंतरच समोर येणार आहे. मात्र, जखमी तरूणास झोळीतून बाहेर काढून दवाखण्यात दाखल करणाऱ्या आतकरवाडीतील नागरिकांच्या संनेदनशिलतेने करावे तेवढे कौतुक कमीच आहे.