Tue, May 30, 2017 04:04
29°C
  Breaking News  


होमपेज › Pune › गैरसमजूतीतून 13 वर्षीय मुलांची नग्नावस्थेत काढली धिंड

गैरसमजूतीतून 13 वर्षीय मुलांची नग्नावस्थेत काढली धिंड

By pudhari | Publish Date: May 19 2017 6:47PM

मुलीला त्रास दिल्याचा गैरसमज झाल्याने 13 वर्षांच्या दोन मुलांना बेदम मारहाण करत त्यांची भरदिवसा वारजे माळवाडी परिसरात नग्नावस्थेत धिंड.


पुणे, प्रतिनिधी

मुलीला त्रास दिल्याचा गैरसमज झाल्याने 13 वर्षांच्या दोन मुलांना बेदम मारहाण करत त्यांची भरदिवसा वारजे माळवाडी परिसरात नग्नावस्थेत धिंड काढल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी समोर आला आहे.  या घटनेची व्हिडीओ क्लीपदेखील व्हाट्स अॅप वर व्हायरल झाली आहे. याप्रकरणी पीडित मुलाच्या आईने तक्रार दिली असून धिंड काढणार्‍या चार जणांना अटक करण्यात आली आहे. तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. 

नवीन कुंदन खुराना (वय 47, रा. शिवगंगा सोसायटी, कर्वेनगर), यश नवीन खुराणा (वय 19), राजू पिराराम देवासी (वय 24), प्रदिप श्रीकृष्ण साळुंखे (वय 35) अशी अटक केलेल्यांची नावे असून एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगा व नवीन खुराना यांची मुलगी हे कोथरुड परिसरातील एकाच शाळेत शिक्षण घेतात. त्यामुळे त्यांची चांगली ओळख आहे.  मात्र, नवीन खुराना यांना पीडित मुलगा त्यांच्या मुलीला त्रास देतो तसेच या परिसरात फिरतो, असा गैरसमज होता. दरम्यान मंगळवारी सकाळी फिर्यादी यांचा मुलगा व त्याचे दोन मित्र कर्वेनगर भागात स्विमिंगसाठी गेले होते. स्विमिंगनंतर ते एका मित्राला सोडवण्यासाठी कर्वेनगर परिसरातील मावळे आळी परिसरात गेले. मात्र, कर्वेनगर परिसराची माहिती नसल्याने त्यातील एकाने फिर्यादीचा मुलगा व त्याच्या एका मित्राला रस्त्यावरील बाकड्यावर थांबण्यास सांगितले व तो निघून गेला. त्यावेळी एक अनोळखी व्यक्ती तेथे आली व त्याने मुलीसाठी तुम्ही येथे येता व तिला त्रास देता, असे म्हणून मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर नवीन खुराना, त्यांचा मुलगा यश, राजू, प्रदीप व इतरांनी येऊन दोघांनाही लाथा बुक्यांनी मारहाण केली. त्यानंतर दोघांच्याही अंगावरील कपडे फाडून त्यांना नग्न केले. त्यानंतर दोघांची मावळेआळी परिसरातून धिंड काढली. दरम्यान या सर्व घटनेचे कोणीतरी मोबाईल चित्रीकरण केले.त्यानंतर हे चित्रीकरण व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाले. दुसर्‍या दिवशी फिर्यादी यांच्याजवळ राहणारा व मुलाचा मित्राने व्हॉट्सअॅपवर आलेली क्लिप त्यांना दाखवली. त्यानंतर त्याच्या आईला घडलेला प्रकार समजला. त्यांनी तात्काळ वारजे माळवाडी पोलिसांकडे धाव घेऊन घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ तिघांवर गुन्हा दाखल केला. त्यानंतर तपासामध्ये आणखी दोघांची नावे निष्पन्न झाली. त्यानुसार, पोलिसांनी या चार  जणांना अटक केली. तर अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. दरम्यान इतके होऊनही पोलिसांना हा प्रकार कसा, समजला नाही अशी चर्चाही रंगली होती.