Fri, Apr 26, 2019 09:20होमपेज › Pune › ‘मेट्रो’च्या ट्रॅकचे काम वर्षाअखेरीस सुरू होणार

‘मेट्रो’च्या ट्रॅकचे काम वर्षाअखेरीस सुरू होणार

Published On: Aug 10 2018 1:24AM | Last Updated: Aug 10 2018 1:24AMपिंपरी : प्रतिनिधी

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या वतीने पिंपरी-चिंचवड शहरात पुणे मेट्रोचे काम वेगात सुरू आहे. शहरात चिंचवडच्या मदर तेरेसा उड्डाणपुलापासून ते दापोडीतील हॅरिस पुलापर्यंत मेट्रो मार्गिकेचे काम केले जात आहे. या ठिकाणी लोहमार्ग (ट्रॅक) टाकण्यासाठी आणि विद्युत खांब लावण्याचा कामाची निविदा नुकतीच काढण्यात आली असून, हे काम वषार्र्ंअखेरीस सुरू होण्याची दाट शक्यता आहे. 

मेट्रोने रेंजहिल्स ते मदर तेरेसा उड्डाणपुलापर्यंत आणि पुण्यातील वनाज ते शिवाजीनगर अन्न धान्य गोदामापर्यंत लोहमार्ग तयार करण्यासाठी आणि विद्युत खांब बसविण्याच्या कामाची निविदा काढली आहे. हे अंतर सुमारे 17 किलोमीटर आहे. त्यासाठी 4 सप्टेंबरपर्यंत निविदा मागविण्यात आल्या आहेत. त्यानंतर ठेकेदारांशी करारनामा करून वर्कऑर्डर देण्यास किमान 2 महिन्यांचा कालावधी जाणार आहे. त्यामुळे वर्षाच्या अखेरीस म्हणजे डिसेंबर महिन्यात हे काम सुरू होण्याची शक्यता आहे.

तब्बल 1 किलोमीटर अंतराचा सेगमेंट स्पॅन पूर्ण झाल्यानंतर हे काम सुरू करण्याचे मेट्रोचे नियोजन आहे. सध्या खराळवाडी ते एच.ए. कंपनीपर्यंत एकूण 19 स्पॅन पूर्ण झाले आहेत. दापोडीत दोन स्पॅन अवजड क्रेनने बसविले गेले आहेत. त्यावर दुसरा भारतीय बनावटीचा सेगमेंट लॉन्चर मशिन बसविण्याचे काम सुरू झाले आहे. तेथून फुगेवाडी, कुंदननगर व कासारवाडीच्या दिशेने सेगमेंट बसविले जाणार आहेत. या मार्गावर आतापर्यंत एकूण 139 पिलरची उभारणी केली गेली आहे. 

लोहमार्ग तयार करण्याचे काम रेल्वेपेक्षा वेगळे आहे. त्यासाठी रेल्वेप्रमाणे खडीचा वापर केला जाणार नाही. सेगमेंटवर विविध प्रकाराचे कप्पे केल्याने लोहमार्ग बसविण्याचे काम वेगात करता येणार आहे. रेल्वेपेक्षा हा लोहमार्गाचे (स्टँडर्ड गेज) अधिक आयुष्य असणार आहे. सेगमेंटवर विद्युत खांब बसविले जाणार आहेत. ही दोन्ही कामे एकाच वेळी सुरू करून ती दीड वर्षे कालावधीत पूर्ण करण्याची मुदत आहे. त्यानंतर प्रत्यक्ष मेट्रोची चाचणी घेतली जाणार आहे.

विद्युत पुरवठ्यासाठी अद्ययावत केंद्र

ग्रेडसेपरेटरमधील खराळवाडी ते एच.ए. कंपनीपर्यंत असे एकूण 19 स्पॅन पूर्ण झाले आहेत. सुमारे एक किलोमीटरचा सेगमेंट स्पॅन पूर्ण झाल्यानंतर लोहमार्ग व विद्युत खांबाचे काम सुरू केले जाईल. हे काम सुरू होईपर्यंत एका किलोमीटरपेक्षा अधिक अंतराचा स्पॅन पूर्ण झालेला असेल. तसेच, विद्युत पुरवठ्यासाठी अद्ययावत केंद्रही उभारले जाणार आहेत, असे मेट्रोच्या ‘रिच वन’चे मुख्य व्यवस्थापक गौतम बिर्‍हाडे यांनी सांगितले.