Thu, Aug 22, 2019 10:17होमपेज › Pune › ‘मेट्रो’ला झोपडपट्ट्यांची बाधा

‘मेट्रो’ला झोपडपट्ट्यांची बाधा

Published On: Apr 20 2018 1:16AM | Last Updated: Apr 20 2018 12:35AMज्योती भालेराव-बनकर 

पुणे : पुणे मेट्रो प्रकल्पात शहरातील जवळपास चार ते पाच मोठ्या झोपडपट्ट्या अडथळा ठरत असल्याचे समोर आले आहे. या झोपडपट्यांच्या पुर्नवसनानंतरच मेट्रोचा मार्ग सुकर होणार आहे. यात प्रामुख्याने राजीव गांधी झोपडपट्टी, तोफखाना झपडपट्टी आणि कामगार पुतळा झोपडपट्टी यांचा समावेश असून या झोपडपट्यांचे कुठे आणि कधी पुनर्वसन होणार याचे निश्‍चित उत्तर सध्या महामेट्रो आणि महानगरपालिका प्रशासन यांच्याकडेही नाही. 

पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मेट्रोच्या मार्गिका क्रमांक 1 वरील मार्गावर या सर्व बाधीत झोपडपट्ट्या आहेत. सिव्हील कोर्टापासून पुढे धान्य गोदामाजवळून हा मार्ग होत आहे. यासाठी त्याच्या बाजूच्या वसाहतीतील अनेक घरे पाडावी लागणार आहेत. सध्या महामेट्रो आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने या परिसराचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. या सर्वेक्षणातून नागरिक आणि प्रशासन यांच्या बोलणीतून पुनर्वसनाचा निर्णय घेण्यात येणार आहे. 

येथील रहिवाशांना सध्या धानोरी, मुंढवा आणि विमाननगर या तीन ठिकाणी स्थलांतरासाठी पर्याय देण्यात आले आहेत. मात्र मुख्य निर्णय अजून प्रलंबित आहेत. या मार्गात असेही काही भाग आहेत की ज्यांच्या वसाहतीचा  भाग मेट्रो मार्गाने बाधीत असल्यामुळे त्यांचे पुनर्वसन करावे लागणार आहे.यावर लवकरच तोडगा काढण्यात येईल असे महामेट्रोच्या अधिकार्‍यांकडून स्पष्ट करण्यात आले.