Mon, May 20, 2019 08:02होमपेज › Pune › निकृष्ट काम दिसल्याने मेट्रोचा खांब जमीनदोस्त

निकृष्ट काम दिसल्याने मेट्रोचा खांब जमीनदोस्त

Published On: May 24 2018 8:22PM | Last Updated: May 24 2018 8:22PMपुणे : प्रतिनिधी

वनाज ते रामवाडी (रिच 2) मार्गावरिल नदीपत्रातील काम जोमाने सुरु असतानाच, काँक्रीटीकरणात दोष आढळल्याने 158 क्रमांकाचा पियर तोडावा लागला आहे. या खांबाच्या पायाला कोणताही धक्का पोहोचला नसून, वरील भागाची उभारणी पुन्हा केली जाणार असल्याचे महामेट्रोने स्पष्ट केले आहे.

नदीपात्राच्या कडेने सुरू असलेल्या या कामापैकी संभाजी पुलालगतच्या काही खांबांचे काम पूर्ण झाले आहे. संभाजी पुलाकडून बाबा भिडे पुलाच्या दिशेने उभारलेला एक खांब महामेट्रोने तोडण्यास सुरुवात केली आहे. मेट्रोचा खांब तोडला जात असल्याने अनेक नागरिकांच्या मनात शंका निर्माण झाली. मनसेचे अध्यक्ष अजय शिंदे यांनीही हा प्रकार गंभीर असून, त्याबाबत खुलासा करण्याची मागणी केली. 

महामेट्रो प्रशासनाकड़ून मेट्रो प्रकल्पाच्या नदीपात्राच्या कडेने सुरू असलेल्या खांबांच्या कामादरम्यान, एका खांबांसाठी वापरण्यात आलेले काँक्रिट निकृष्ट दर्जाचे असल्याचे आढळून आल्याने, संबंधित खांबाचा जमिनीवरील काही भाग महामेट्रोने तोडला. ‘खांबाची उभारणी करताना त्याला लावण्यात येणार्‍या ‘शटरिंग’मधून (लोखंडी जाळ्या) काँक्रिटची गळती होत असल्याचे अभियंत्यांच्या लक्षात आले. खांबाच्या इतर भागाला धोका पोहोचू नये, यासाठी तत्काळ काम थांबविण्यात आले.

आवश्यक तपासणी आणि दुरुस्ती केल्यानंतर खांबाच्या वरील भागाचे काम पुन्हा करण्यात येणार आहे. हे काम एनसीसी लिमिटेड कंपनी करत असल्याने पाडाव्या लागलेल्या कामाचा पूर्ण खर्च तेच करणार आहेत, अशी माहिती मुख्य प्रकल्प व्यवस्थापक  गौतम बिर्‍हाडे यांनी दिली.