Thu, Mar 21, 2019 11:07होमपेज › Pune › ‘बंडोबां’ना थंड करण्यासाठी ‘स्वीकृत सदस्य’चे गाजर

‘बंडोबां’ना थंड करण्यासाठी ‘स्वीकृत सदस्य’चे गाजर

Published On: Jun 30 2018 1:19AM | Last Updated: Jun 30 2018 12:43AMवडगाव मावळ  : गणेश विनोदे 

वडगाव नगरपंचायत निवडणुकीसाठी पक्षाची अधिकृत उमेदवारी न मिळाल्याने नाराज होऊन अपक्ष अर्ज दाखल केलेल्या बंडोबांना थंड करण्यासाठी ‘स्वीकृत’चे गाजर दाखवले जात असून, सोमवारी निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे.

नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी 13 तर नगरसेवकपदासाठी 80 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. यापैकी नगराध्यक्षपदाचे 11 तर नगरसेवक पदाचे 70 उमेदवारांचे अर्ज छाननीमध्ये वैध ठरले आहेत.  भाजपने नगराध्यक्षपदासाठी एका ज्येष्ठ नेत्याससह नगरसेवकपदाच्या 17 प्रभागातील अधिकृत उमेदवार अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी उमेदवारांची नावे जाहीर केली असून, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसनेही आघाडीची घोषणा करत 17 प्रभागातील उमेदवार घोषित केले आहेत. परंतु, आघाडीच्या वतीने नगराध्यक्षपदासाठी एका उमेदवारासह राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षाच्या चिरंजीवाने पक्षाच्या एबी फॉर्मसह अर्ज दाखल केला आहे; तसेच राष्ट्रवादी सहकार सेलचे तालुकाध्यक्ष यांनीदेखील अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने आघाडीचे पुढील गणित नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीवर अवलंबून असल्याचे सध्यातरी दिसते आहे.

भाजपाने नगराध्यक्षपदाची अधिकृत उमेदवारी जाहिर केल्यानंतरही भाजपमध्ये नुकताच प्रवेश करून नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी अखेरपर्यंत स्पर्धेत राहिलेले एक युवा कार्यकर्ते, माजी आमदारांचे चिरंजीव व भाजपचे एक निष्ठावंत कार्यकर्ते यांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे आघाडीसह भाजपमध्येही अपक्ष अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची माघार घेण्यासाठी नेतेमंडळींचा कस लागणार आहे. तसेच, पंचायत समितीचे उपसभापती म्हणून काम केलेल्या एका युवा कार्यकर्त्याने प्रभाग 9 मध्ये तर पक्षाचे क्रियाशील पदाधिकारी म्हणून जबाबदारी संभाळणार्‍या दोन जणांनी प्रभाग 15 मध्ये, माजी ग्रामपंचायत सदस्यासह त्यांच्या पतीने प्रभाग 12 मध्ये व पक्षामध्ये क्रियाशील पदाधिकारी म्हणून काम करणार्‍या कार्यकर्त्यांच्या पत्नींनी उमेदवारी अर्ज दाखल करुन भाजपचे बंडखोर म्हणून पवित्रा घेतला आहे.

आघाडीमध्येही प्रभाग क्र.5 मध्ये राष्ट्रवादी शहराध्यक्षांची पत्नी व प्रभाग क्र.9 मध्ये राष्ट्रवादीच्या दोन क्रियाशील पदाधिकार्‍यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे भाजप व आघाडीमधील या बंडोबांना थंड करण्यासाठी नेतेमंडळींची धडपड सुरु आहे. अर्ज माघारीसाठी दि.2 पर्यंत मुदत असल्याने बंडोबांना थंड करण्यासाठी आता ‘स्विकृत‘ चे गाजर दाखवले जात असून याआधी सर्वच पक्षांंमध्ये इच्छुकांना अर्ज दाखल करण्यापासून रोखण्यासाठीही हेच गाजर दाखविले गेले असल्याने स्विकृतचे गाजर कोणाच्या पदरात पडणार हा प्रश्‍नच आहे.

एकच दिवस उरल्याने झाली धावपळ 

दरम्यान, अर्ज मागे घेण्यासाठी सोमवार दि. 2 जुलैपर्यंत ही अखेरची मुदत असून, शनिवार व रविवार शासकीय सुट्टी आहे. अर्ज मागे घेण्यासाठी आता केवळ एकच दिवस उरला असून, बंडोबांना थंड करण्यासाठी दोन दिवसांचा अवधी राहिला आहे. त्यामुळे दोन्ही पक्षातील नेतेमंडळी व अधिकृत उमेदवारांची चांगलीच धावपळ उडाली असल्याचे दिसते.