Sun, Mar 24, 2019 05:03होमपेज › Pune › पालिकेची वैद्यकीय यंत्रणा कोमात अन् खासगी रुग्णालये जोमात

पालिकेची वैद्यकीय यंत्रणा कोमात अन् खासगी रुग्णालये जोमात

Published On: Aug 25 2018 1:16AM | Last Updated: Aug 24 2018 10:19PMनेहरूनगर : बापू जगदाळे 

पिंपरी - चिंचवड शहरात गेले सहा दिवस पडत असलेल्या पावसामुळे वातावरण रोगट बनले असून सर्दी, ताप, खोकला अशा आजारांनी नागरिक त्रस्त झाले आहेत. आजारपणामुळे शहरातील महापालिका रुग्णालये आणि खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी वाढू लागली आहे. परंतु महापालिकेची वैद्यकीय यंत्रणा अपुरी पडत असल्यामुळे रुग्णांना आर्थिक भुर्दंड सहन करत खासगी रुग्णालयांमध्ये उपचार करावे लागत आहेत. ऐन पावसाळ्यात महापालिकेची वैद्यकीय यंत्रणा कोमात गेली असून खासगी रुग्णालये मात्र जोमात असल्याचे चित्र शहरात पाहावयास मिळत आहे.

संततधार पावसामुळे गारठा वाढला आहे. तसेच वातावरण दूषित बनले आहे. याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होऊन ते साथीच्या आजारांना बळी पडत आहेत. संसर्ग होऊन वृद्ध आणि लहान मुलांचे आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पालिकेच्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी नागरिकांची गर्दी होत असून वैद्यकीय नियोजनाचा अभाव असल्यामुळे रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. 

महापालिका प्रशासन अद्याप नागरिकांना पुरेशा वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देऊ शकली नाही, असा आरोपही नागरिकांमधून होत आहे. महापालिकेच्या रुग्णालयात व्यवस्थित उपचार मिळत नसल्यामुळे रुग्णांना खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागत आहेत. खराब वातावरणामुळे रुग्णांची संख्या वाढत असल्याचा फायदा काही खासगी रुग्णालये घेत असून उपचाराच्या नावाखाली भरमसाट ‘फी’ आकारली जात आहे, अशा प्रतिक्रिया रुग्णांमधून व्यक्त होत आहेत.पावसाळ्यात साथीच्या आजाराचे प्रमाण दरवर्षी वाढत असते. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने अगोदरच उपाययोजना करणे आवश्यक होते. मात्र, नागरिकांच्या आरोग्याबाबत महापालिका प्रशासनाला काहीच देणेघेणे नाही, अशा संतप्त प्रतिक्रियाही नागरिकांमधून उमटत आहेत.

नवीन रुग्णालयाच्या इमारती धूळ खात

महापालिका प्रशासनाने नागरिकांना चांगल्या दर्जाच्या वैद्यकीय सुविधा देण्यासाठी नवीन रुग्णालये उभारली आहेत. भोसरीत अनेक वर्षांपासून नवीन रुग्णालयाची इमारत बांधून तयार आहे, पण महापालिकेकडे डॉक्टर आणि कर्मचारी वर्ग नसल्यामुळे नवीन रुग्णालये धूळ खात पडून आहेत. कोट्यवधी रुपयांचा खर्च करून बांधलेली नवीन रुग्णालये महापालिका प्रशासनाने सुरू करावीत, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

हंगाम पाहून दरात वाढ

पावसाळा सुरू झाला की साथीचे आजार डोके वर काढतात. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांना संसर्गजन्य आजारांचा सामना करावा लागतो. साहजिकच पावसाळ्यात रुग्णालयांमध्ये रुग्णांची प्रचंड गर्दी वाढत असते. या संधीचा फायदा घेण्यासाठी पावसाळ्यात खासगी रुग्णालये आणि ओपीडी चालविणारे डॉक्टर आपली फी भरमसाट वाढवतात. त्यांच्यावर कुणाचाच अंकुश राहिलेला नाही. महापालिकेचा आरोग्य विभाग ढिम्म झाल्यामुळे रुग्णांना नाइलाजास्तव आर्थिक भुर्दंड सहन करून खासगी दवाखान्यात उपचार घ्यावे लागत आहेत.

अपुरा कर्मचारी वर्ग आणि नियोजनाचा अभाव

शहरातील नागरिकांना कमी खर्चात चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी महापालिका प्रशासनाने रुग्णालये सुरू केली आहेत. मात्र, रुग्णालयातील अपुरा कर्मचारी वर्ग आणि नियोजनाचा अभाव याचा फटका रुग्णांना बसू लागला आहे. पावसाळ्यात साथीच्या आराजांचे प्रमाण वाढते. या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने उपाययोजना करणे आवश्यक होते. मात्र नागरिकांना आरोग्य सेवा पुरविण्यात महापालिका प्रशासन कमी पडत आहे, असे नागरिकांमधून बोलले जात आहे.

लोकप्रतिनिधींची बघ्याची भूमिका

रोगट हवामानामुळे संसर्गजन्य आजारांचा फैलाव होत असून शहरातील नागरिकांचे स्वास्थ्य बिघडले आहे. महापालिकेची रुग्णालये नावाला उरली असून रुग्णांना चांगल्या सुविधा मिळत नाहीत. प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहेच; पण लोकप्रतिनिधीदेखील बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे. शहरात साथीच्या आजारांनी लोक हैराण झाले असताना लोकप्रतिनिधी कसे काय शांत बसू शकतात, असा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे.