Thu, Apr 25, 2019 07:42होमपेज › Pune › वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट-पीजी सुरळीत

वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट-पीजी सुरळीत

Published On: Jan 08 2018 1:14AM | Last Updated: Jan 08 2018 12:04AM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी 

देशातील सरकारी, खासगी वैद्यकीय महाविद्यालये आणि अभिमत विद्यापीठांमध्ये एमएस, एमडी आणि पदव्युत्तर पदविका या वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्यासाठी राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (नीट- पीजी) परीक्षा ऑनलाइन पद्धतीने पुण्यासह देशभरात रविवारी सुरळीत पार पडली. 

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या परीक्षेची काठीण्यपातळी अधिक होती आणि ‘निगेटिव्ह मार्किंग’मुळे प्रश्न सोडविण्यात अडचणी आल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली आहे. केंद्र सरकारच्या नियमाप्रमाणे देशातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पदवीप्रमाणेच पदव्युत्तर पदवी आणि पदविका अभ्यासक्रमांना प्रवेश हे नीट-पीजी प्रवेश परीक्षेद्वारे होतात. महाविद्यालयांमध्ये 2018-19 या शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षेसाठी साधारण 1 लाख 24 हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. 

त्यानुसार रविवारी पुण्यासह देशातील 131 परीक्षा केंद्रावर परीक्षा झाली. केंद्र सरकारच्या माहितीनुसार देशातील महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर पदवी आणि पदविका अभ्यासक्रमांच्या सुमारे 25 हजार जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. तसेच, दरवर्षी या जागांमध्ये 5 हजार जागा वाढविण्यात येईल,असे जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार  गेल्या वर्षी सरकारने  5 हजार 800 जागा वाढविल्या आहेत. यंदा देखील या जागांमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

राष्ट्रीय परीक्षा बोर्डाने (एनबीए) ’नीट-पीजी’ परीक्षा घेण्यासाठीचे कंत्राट यंदा टीसीएस या खासगी कंपनीला दिले आहे. गेल्या वर्षी हे कंत्राट प्रोमॅट्रिक कंपनीला दिले होते. मात्र, परीक्षेचे योग्यप्रकारे नियोजन न केल्याच्या अनेक तक्रारी एनबीएकडे आल्यावर यंदा हे कंत्राट टीसीएसला देण्यात आले होते. 

त्यामुळे यावर्षी प्रवेश परीक्षेत कोणतीच अडचण किंवा गैरप्रकार होऊ नयेत, अशी अपेक्षा विद्यार्थ्यांनी व्यक्त केली होती. दरम्यान यावर्षी परीक्षेची काठिण्यपातळी अधिक होती. तसेच यापूर्वी झालेल्या प्रवेश परीक्षेत निगेटीव्ह मार्किंग नव्हती. 

मात्र, यंदा प्रथमच परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग प्रणाली होती. त्यानुसार एखाद्या प्रश्नाचे उत्तर चुकल्यावर एक गुण कमी होणार होता. त्यामुळे अनेकांना पेपर सोडविताना संभ्रम निर्माण झाला असलल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

दरम्यान, केंद्र सरकारने प्रवेशासाठी पात्र होणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेऊन अभ्यासक्रमाच्या जागा वाढवाव्यात अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.