Thu, Aug 22, 2019 12:28होमपेज › Pune › मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी लक्ष्मीकांत देशमुख (व्हिडिओ)

साहित्य संमेलनाध्यक्षपदी कादंबरीकार लक्ष्मीकांत देशमुख (व्हिडिओ)

Published On: Dec 10 2017 2:26PM | Last Updated: Dec 10 2017 6:32PM

बुकमार्क करा

नागपूर : वृत्तसंस्था

फेब्रुवारीत बडोदा येथे होणार्‍या 91व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कादंबरीकार, कथालेखक लक्ष्मीकांत देशमुख यांची निवड झाली आहे. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार साहित्यिक रवींद्र शोभणे यांचा 70 मतांनी पराभव केला.

अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या पंचरंगी लढतीत देशमुख यांना 427 मते मिळाली, तर शोभणे यांना केवळ 357 मते मिळाली. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत लक्ष्मीकांत देशमुख यांच्यासह राजन खान, रवींद्र शोभणे, किशोर सानप, रवींद्र गुर्जर असे पाच उमेदवार निवडणूक रिंगणात उभे होते. या अत्यंत अटीतटीच्या आणि चुरशीच्या निवडणुकीत कादंबरीकार लक्ष्मीकांत देशमुख यांनी घवघवीत मते घेऊन बाजी मारली.

विजयासाठी 435 मतांचा कोटा पूर्ण करायचा होता. परंतु, मतमोजणीच्या चार फेर्‍यांनंतरही हा कोटा कोणत्याच उमेदवाराला पूर्ण करता आला नाही. त्यामुळे सर्वाधिक  427 मते मिळविणार्‍या लक्ष्मीकांत देशमुख यांना विजयी घोषित करण्यात आले. प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही डॉ. रवींद्र शोभणे विजय खेचून आणू शकले नाहीत. राजन खान यांचे वाङ्मयीन योगदान मोठे असूनही त्यांना कसाबसा तिहेरी आकडा गाठता आला. या निवडणुकीत मराठवाडा साहित्य परिषदेने लक्ष्मीकांत देशमुख यांना पाठिंबा जाहीर केला होता. लक्ष्मीकांत देशमुख हे 2009 ते 2012 या काळात कोल्हापूरचे जिल्हाधिकारी होते.

असा लागला निकाल

एकूण मतदार - 1,073 
एकूण मतदान -  896
वैध मते - 868
अवैध मते - 28
एकूण फेर्‍या - 4
अंतिम निकाल 
लक्ष्मीकांत देशमुख - 427
डॉ. रवींद्र शोभणे - 357
राजन खान - 123
डॉ. किशोर सानप - 47
रवींद्र गुर्जर - 41