होमपेज › Pune › पुणे : उरुळीकांचन शहरात व्यापारी व आंदोलनकर्त्यांमधील मारहाणीमुळे तणाव 

पुणे : उरुळीकांचन शहरात व्यापारी व आंदोलनकर्त्यांमधील मारहाणीमुळे तणाव 

Published On: Jul 30 2018 12:30PM | Last Updated: Jul 30 2018 12:30PMउरूळी कांचन ( ता. हवेली, पुणे ) : वार्ताहर  

मराठा आरक्षणाच्या मागणी संदर्भात मराठा संघटनांतर्फे सोमवार( दि.३०) रोजी केलेल्या हवेली बंदच्या अवाहन केले होते. या आंदोलनादरम्यान उरुळी कांचन (ता.हवेली ) येथे वाद झाला.  

मराठा संघटनांनी महात्मा गांधी रस्तावरील व्यापाऱ्यांना केलेल्या बंदच्या आवाहन केले होते. याचदरम्यान, आंदोलक आणि व्यापाऱ्यांत सकाळी मारहाणीचा प्रकार  घडल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी तातडीने प्रकरण शांततेने हाताळण्याचा प्रयत्न केला असून पोलिसांची अतिरीक्त कुमक उरुळी कांचन शहरात तैणात करण्यात आली आहे.

मराठा आरक्षण मागणीसंदर्भात सकल मराठा संघटनांनी हवेली तालुका बंद करण्याच्या आवाहनास उरुळी कांचन शहरात सकाळपासून संधिग्ध भूमिका ग्रामस्थांत होती. शहरातील आश्रमरस्ता व गावठाण परिसरात व्यापाऱ्यांकडून स्वतःहून दुकाने बंद ठेवण्यात आली होती. परंतु, महात्मा गांधी रस्तावरील काही व्यापाऱ्यांनी व्यवहार सुरळीत सुरू केले होते. मराठा संघटनांच्या  सुमारे पन्नासहून अधिक आंदोलकर्त्यांनी महात्मा गांधी रस्तामार्ग येथे येत व्यापाऱ्यांना बंदचे आवाहन केले. या बंदच्या आवाहनास काही व्यापाऱ्यांनी विरोध दर्शविला. यादरम्यान व्यापारी आणि काही आंदोलकर्त्यांत बाचाबाची होऊन या वादाचे पर्यावसन मारहाणीत झाल्याने काही काळ तणाव निर्माण झाला.

त्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आंदोलकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तातडीने आंदोलकांची राम मंदिरात बैठक घेऊन बंद शांततेत पार पाडण्याची सूचना केली. त्यानंतर आंदोलकांनी शांततेत पुणे - सोलापूर महामार्गावर तळवाडी चौकात निषेध सभा घेऊन बंदच्या आवाहनात सहभागी होण्याचे आवाहन केले. 

दरम्यान, मराठा क्रांती मोर्चाच्या मंगळवार (दि.२४ ) रोजीच्या महाराष्ट्र राज्य बंद च्या आंदोलनास उरुळी कांचन मधील व्यापाऱ्यांनी पाठिंबा देऊन बंद पाळला होता. हवेली तालुक्यातील मंगळवार दि.३० रोजीचा बंद आवाहनास उरुळी कांचन व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिला आहे. काही खाजगी शाळा बंद ठेवल्या आहेत. तर आरोग्य सेवा सुरळीत सुरू ठेवण्यात आल्या आहेत. दरम्यान लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांनी परिस्थितीची पाहणी केली असून पोलिस बंदोबस्त तैणात केला आहे. 

पोलिस कारवाई करणार 

उरुळी कांचन बंदच्या व्यापारी व आंदोलनकर्त्यांत झालेल्या मारहाणीची कायदेशीर तक्रार घेऊन संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकांत इंगवले यांनी स्पष्ट केले आहे.