Sun, Aug 18, 2019 20:47



होमपेज › Pune › मराठा आंदोलनावरून महापालिका सभागृहात तोडफोड (Video)

मराठा आंदोलनावरून महापालिका सभागृहात तोडफोड (Video)

Published On: Jul 26 2018 8:55PM | Last Updated: Jul 26 2018 8:03PM



पुणे : प्रतिनिधी 

सध्या राज्यात पेटलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाचे पडसाद दुसऱ्या दिवशीही पुणे महापालिका सभागृहात उमटले. विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी घोषणाबाजी करत मराठा आरक्षणावर बोलण्याची मागणी केली. मागणी मान्य होत नसल्याचे लक्षात येताच शिवसेना नगरसेवकांनी महापौरांच्या आसणासमोर धाव घेऊन समोरील टेबलवरील वस्तू ढकलून देत तोडफोड केली. या गोंधळातच महापौर मुक्ता टिळक यांनी सभा तहकूब केल्याचे जाहीर केले. 

महापालिकेची जुलै महिन्याची तहकुब सर्वसाधारण सभा गुरूवारी घेण्यात आली होती. या सभेची सुरूवात होण्यापूर्वीच सेना मनसेच्या नगरसेवकांनी सभागृहात फलक फडकवत घोषणाबाजी सुरू केली. महापौर स्थानापन्न होताच घोषणाबाजीने जोर धरला. महापौरांनी नगरसेवकांना आपापल्या जागोवर जाण्याची विनंती केली मात्र आरक्षणावर बोलू न दिल्यास सभा चालू देणार नाही, असा ईशारा सेना गटनेत्यांनी दिला. याच मुद्द्यावर कालची (बुधवार) सभा तहकुब केली होती, असे म्हणत महापौरांनी सभागृहाचा अवमान करू नये अशी विनंती केली. मात्र घोषणाबाजी थांबण्याचे नाव घेत नसल्याने सत्ताधारी नगरसेवकांनी सभा तहकुबीच्या हालचाली सुरू केल्याचे लक्षात येताच विरोधकांनीही सभा तहकुबी मांडली. विरोधकांची तहकुबी थांबवून सत्ताधाऱ्यांची तहकुबी नगरसचिवांनी वाचण्यास सुरूवात करताच काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, मनसेच्या नगरसेवकांनी अक्षेप घेत सभागृहात जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरूवात केली. या गोंधळातच शिवसेना नगरसेवकांनी मानदंड पळविण्यासाठी महापौरांच्या आसणाकडे धाव घेतली. वेळीच भाजपचे नगरसेवकांनी मानदंड ताब्यात घेतल्याने चिडलेल्या सेना नगरसेवकांनी महापौर आणि आयुक्तांच्या टेबलवरील साहित्य ढकलून देत तेथील वस्तूंची तोडफोड केली. यावेळी सत्ताधारी नगरसेवकांनीही महापौरांच्या आसणाकडे धाव घेवून संरक्षण देत विरोधकांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यास सुरूवात केली. या गोंधळातच महापौरांनी सभा एक महिन्यासाठी तहकुब केली. 

शिवसेनेची स्टंट बाजी : महापौर 

मराठा समाजाला आरक्षण मिळावी, हीच भाजपची भूमीका आहे. हा विषय न्यायप्रविष्ट असून तो मार्गी लावण्यासाठी राज्य शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. हा विषय महापालिकेच्या कार्यक्षेत्रात येत नाही. सभासदांना जागेवर बसण्याची विनंती केली होती, त्यानंतर बोलण्याची संधी देणार होते. मात्र सेनेचे नगरसेवक ऐकत नव्हते. त्यांना स्टंटबाजी करायची होती. समाजातील वातावरण बिघडू नये म्हणून तोडफोड करणाऱ्या नगरसेवकांवर कारवाई केली जाणार नाही. मात्र भविष्यात असे प्रकार केल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा महापौर मुक्ता टिळक यांनी दिला आहे.