होमपेज › Pune › मान्सून अखेर केरळात दाखल 

मान्सून अखेर केरळात दाखल 

Published On: May 29 2018 1:26PM | Last Updated: May 29 2018 1:26PMपुणे: प्रतिनिधी

येणार येणार म्हणत नैर्ऋत्य मोसमी पाऊस (मान्सून) अखेर केरळमध्ये मंगळवारी (दि. २९) दाखल झाला. भारतीय हवामान विभागाने याबाबत माहिती दिली. २५ मे रोजी अंदमान येथे मान्सून दाखल झाल्यानंतर केरळमध्ये तो कधी दाखल होतो याबाबत नागरिकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. मात्र मेकुनू चक्रीवादळामुळे केरळच्या दिशेने येणारे बाष्पयुक्त ढग ओमानच्या दिशेने ओढून नेले. दोन दिवसांपूर्वी अरबी समुद्रात केरळ ते कर्नाटक किनारपट्टी दरम्यान समांतर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून मंगळवारीदेखील ते स्थिर होते. त्याच्याच प्रभावामुळे केरळमध्ये मान्सून दाखल झाल्याचे सांगण्यात आले. 

केरळमध्ये दरवर्षी सर्वसाधारणपणे मान्सून १ जून रोजी दाखल होतो. मागील वर्षी तो वेळापत्रकाच्या दोन दिवस आगोदर तर यंदाच्या वर्षी तब्बल तीन दिवस आगोदर दाखल झाला आहे. दरम्यान, केरळप्रमाणेच दक्षिण पूर्व अरबी समुद्राचा उर्वरित भाग, कोमोरीन-मालदीव, संपूर्ण लक्षद्वीप, तमिळनाडूचा काही भाग, दक्षिण पश्‍चिम, मध्य व उत्तर पूर्व बंगालचा उपसागर येथे मान्सून पोहोचल्याचे जाहीर करण्यात आले. मान्सूनची उत्तर सीमा मंगळवारी कन्नूर, कोइम्बतूर, तुतीकोरीन अशी होती. पुढील ४८ तासात मध्य अरबी समुद्राचा आणखी भाग, दक्षिण व अंतर्गत कर्नाटक, ईशान्य भारताचा काही भाग येथे मान्सून पोहोचण्यास अनुकूल वातावरण असल्याचे हवामान विभागाने सांगितले. येत्या २४ तासात पूर्व मध्य व लगतच्या परिसरात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार असून बंगालच्या उपसागरात २-३ दिवस मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाजही वर्तविण्यात आला आहे. 

राज्यातही मान्सूनची लवकर एन्ट्री? 

अरबी समुद्रात केरळ ते कर्नाटक किनारपट्टी दरम्यान निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मान्सूनची पुढील वाटचाल वेगाने होत आहे. यामुळे राज्यातही तो वेळापत्रकाच्या आगोदरच एन्ट्री करेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. राज्यातील दक्षिण कोकणात दरवर्षी मान्सून ५ जून रोजी दाखल होतो व ७ जून रोजी पुणे व मुंबई येथे पोहोचतो तर १५ जूनपर्यंत विदर्भासह संपूर्ण राज्य व्यापले जाते. यंदाच्या वर्षी तो कधी दाखल होतो हे पाहणे मात्र औत्सुक्याचे ठरणार आहे. दरम्यान, राज्यात अद्यापही मान्सून दाखल झाला नसला तरीदेखील पूर्वमोसमी पाऊस सुरूच आहे. गेल्या २४ तासात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी वार्‍यांसह पावसाने हजेरी लावली. पुढील पाचही दिवस संपूर्ण राज्यात पूर्वमोसमी पाऊस हजेरी लावेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.