Thu, Jun 27, 2019 14:26होमपेज › Pune › मांजरी स्थानकाच्या ‘प्लॅटफॉर्म’ला मुहूर्त नाही

मांजरी स्थानकाच्या ‘प्लॅटफॉर्म’ला मुहूर्त नाही

Published On: Apr 13 2018 1:19AM | Last Updated: Apr 12 2018 11:56PMपुणे : निमिष गोखले

पुणे-दौंड लोहमार्गावर मांजरी बुद्रुक स्थानक असून येथील प्लॅटफॉर्मची उंची वाढविण्यास अद्याप मुहूर्तच मिळाला नसल्याचे दिसत आहे. मांजरी बुद्रुकच्या प्लॅटफॉर्मचे काम अद्यापही सुरूच झाले नसून, प्रवाशांना रेल्वेतून उतरताना फार मोठी कसरत करावी लागत आहे. मांजरी, कडेठाण व खुटबाव ही लहान स्थानके विकसित करण्याच्या दृष्टीने 2017 च्या रेल्वे बजेटमध्ये त्यांच्या प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्याबाबत तरतूद करण्यात आली. 7 कोटी 35 लाख रुपयांचा निधी यासाठी मंजूर करण्यात आला. प्रत्यक्षात मात्र मांजरी बुद्रुक प्लॅटफॉर्मच्या कामाचा पत्ताच नसल्याचे धक्कादायक चित्र आहे.

सुमारे वर्षभरापासून खुटबाव व कडेठाण या स्थानकांच्या प्लॅटफॉर्मची उंची वाढविण्याचे काम सुरू असून, खुटबावचे काम जवळपास पूर्ण झाले असल्याचे पाहणीतून दिसून आले. तर कडेठाण येथील प्लॅटफॉर्मचे काम संथगतीने सुरू आहे. दरम्यान, या दोन्ही स्थानकांची कामे पूर्ण झाल्याशिवाय मांजरी बुद्रुकचे काम सुरूच करता येणार नाही, असे उत्तर रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आले. यामुळे मांजरीकरांचे प्लॅटफॉर्मचे स्वप्न आणखी काही महिने तरी अपूर्णच राहणार असल्याचे दिसते.

31 मार्च 2018 पर्यंत या तिन्ही स्थानकांच्या प्लॅटफॉर्मची कामे पूर्णत्वास येतील, असे आश्‍वासन पुणे विभागाचे वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक कृष्णाथ पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिले होते. प्रत्यक्षात मात्र मुदत उलटूनही हे आश्‍वासन कागदोपत्रीच राहिले असून, आणखी वर्ष-दीड वर्ष तरी मांजरी येथे प्लॅटफॉर्म बांधून होणार नाही, असे चित्र सद्यःस्थितीवरून दिसून येते. मांजरी बुद्रुक येथून दौंड, बारामती, पुणे येथे दररोज शेकडो प्रवासी प्रवास करतात. मात्र प्लॅटफॉर्मच नसल्याने प्रवाशांना रेल्वेतून चढ-उतार करणे जिकिरीचे बनते. यामुळेच येथे प्लॅटफॉर्म बनविण्यात यावा, अशी मागणी प्रवाशांनी केली होती. त्यासाठी निधी देखील मंजूर केला गेला. मात्र, रेल्वेच्या ढिसाळ कारभारामुळे हे काम रखडले असल्याचे दिसून येते. 

दरम्यान, दि. 25 मार्च 2017 रोजी पुणे-दौंड दरम्यान डेमू (डिझेल मल्टिपल युनिट) सुरू करण्यात आली. मांजरी, खुटबाव, कडेठाणला प्लॅटफॉर्म नसल्याने व डेमूला जिने असल्याने ती सुरू करण्यात आल्याचे उत्तर रेल्वेच्या वतीने त्या वेळी देण्यात आले होते. या तिन्ही स्थानकांच्या प्लॅटफॉर्मची कामे पूर्ण झाल्यानंतर विजेवर धावणारी ईमू (इलेक्ट्रिकल मल्टिपल युनिट) सुरू होईल, असेही सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र, ना प्लॅटफॉर्मची कामे पूर्ण झाली, ना ईमू लोकल सुरू झाली. रेल्वेच्या उदासीन कारभाराचा फटका प्रवाशांना भोगावा लागत आहे.

मांजरीचे काम ऑक्टोबरपर्यंत पूर्ण 

एकाच व्यक्तीला (पार्टी) या तिन्ही स्थानकांची कामे देण्यात आली आहेत. खुटबावचे काम पूर्ण झाले असून कडेठाणचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. ते पूर्ण झाल्यानंतरच मांजरीचे काम सुरू करण्यात येईल. ऑक्टोबरपर्यंत मांजरीचे काम पूर्ण होईल.  - मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, पुणे विभाग 

अपघात घडून देखील दुर्लक्षच
मांजरी, कडेठाण येथे रेल्वे पकडताना लहान-मोठे अपघात घडले आहेत. प्लॅटफॉर्मच नसल्याने तोल जाऊन पडण्याचे प्रकार घडले असून तरीदेखील रेल्वे प्रशासन सुस्तच आहे. एका देखील राजकीय पक्षाने यात लक्ष घालून प्लॅटफॉर्मचे काम झपाट्याने पूर्ण होईल याकरिता प्रयत्न केलेले नाहीत. - दिलीप होळकर, प्रवासी