Sun, Aug 25, 2019 23:26होमपेज › Pune › MPSC चा निर्णय; परीक्षा केंद्रात अर्धा तास अगोदर न आल्यास 'नो एन्‍ट्री'

MPSC चा निर्णय; परीक्षा केंद्रात अर्धा तास अगोदर न आल्यास 'नो एन्‍ट्री'

Published On: Jul 21 2018 7:43PM | Last Updated: Jul 21 2018 7:43PMपुणे : प्रतिनिधी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) घेण्यात येणार्‍या परीक्षांसाठी जे विद्यार्थी परीक्षेच्या वेळेच्या अर्धा तास अगोदर येणार नाहीत त्यांना कोणत्याही परस्थितीत परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नसल्याचे एमपीएससीद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, परीक्षेदरम्यान होणारा गैरप्रकार टाळण्यासाठी विद्यार्थ्यांना परीश्रा केंद्रावर दीड तास अगोदर हजर राहणे अनिवार्य करण्यात आले असून या निर्णयाची अंमलबजावणी १ ऑगस्टपासून करण्यात येणार असल्याचे आयोगाद्वारे जाहीर करण्यात आले. 

एमपीएससीद्वारे घेण्यात येणार्‍या विविध परीक्षांना उमेदवार परीक्षा केंद्रावर ५ ते १० मिनिट उशिरा पोहचल्याने त्यांना परीक्षेला मुकावे लागल्याचे अनेक प्रकार समोर आले होते. त्याविरोधात अनेकांनी आयोगाकडे तक्रारीही केल्या होत्या. नुकतेच पुणे शहरातील अहिल्या शाळेच्या केंद्रावर झालेल्या परीक्षेला काही मिनिटे उशिरा पोहचल्याने सहा उमेदवारांना परीक्षेस मुकावे लागले होते. दरम्यान, स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांचे परीक्षेला मुकण्याचे प्रकार टाळण्यासाठी परीक्षेच्या वेळेची काटेकोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय एमपीएससीने घेतला आहे. 

एमपीएससीद्वारे १२ एप्रिल २०१८ रोजी घेण्यात आलेल्या निर्णयानुसार परीक्षार्थ्यांना परीक्षा सुरू होण्यापूर्वी एक तास आधी केंद्रांवर येण्याचे अनिवार्य करण्यात आले होते. दरम्यान, परीक्षेपूर्वी आयोगाद्वारे गैरप्रकार टाळण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनामंध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ करण्यात आली आहे. आयोगाद्वारे यापुढील परीक्षांसाठी बायोमेट्रिक तपासणी, विद्यार्थ्यांची तपासणी आणि कडक बंदोबस्त ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उमेदवारांना यापुढील परीक्षांसाठी परीक्षा केंद्रावर आता दीड तासांपूर्वी उपस्थित राहणे अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच प्रत्यक्ष परीक्षा सुरू होण्यापूर्वी अर्धा तास विद्यार्थ्यांना कक्षात येता येणार आहे. त्यानंतर परीक्षा कक्षात येणार्‍या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू दिले जाणार नसल्याची माहिती एमपीएससीचे उपसचिव सुनील अवताडे यांनी दिली आहे.