Mon, Jul 22, 2019 02:38होमपेज › Pune › अब्रू वाचवण्यासाठी विवाहितेची गॅलरीतून उडी

अब्रू वाचवण्यासाठी विवाहितेची गॅलरीतून उडी

Published On: Apr 07 2018 1:49PM | Last Updated: Apr 07 2018 1:49PMपिंपरी : प्रतिनिधी 

पतीचा मोबाईल शोधण्यासाठी मदत करण्याचा बहाणा करून घरात घुसलेल्या व्यक्तीने एका महिलेचा विनयभंग केला; तसेच तोंड दाबून महिलेवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. स्वतःची अबू्र वाचवण्यासाठी विवाहितेने शयनगृहाच्या गॅलरीतून उडी मारली. यामध्ये महिला जखमी झाली असून, तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर आरोपीचा शोध वाकड पोलिस करीत आहेत. हा प्रकार गुरुवारी (दि. 5) मध्यरात्री सव्वादोनच्या सुमारास रहाटणीत घडला. 

याप्रकरणी पीडित महिलेने वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली तर अज्ञात आरोपीच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेच्या पतीचा मोबाईल चोरीला गेला होता. पतीने मोबाईलची शोधाशोध सुरू केली, मात्र मोबाईल न सापडल्याने पोलिसांकडे तक्रार देण्याचे ठरवले. 

दरम्यान, पीडित महिलेच्या पतीला एकजण भेटला. मी तुम्हाला पोलिसांकडे तक्रार देण्यासाठी मदत करतो, असे म्हणून त्यांना विश्‍वासात घेतले. त्यावेळी पतीने पत्नीला पोलिस चौकीत मोबाईल हरविल्याची तक्रार देऊन येतो असे सांगून घरातून संबंधित व्यक्तीसमवेत पोलिस चौकीकडे निघाला.

दुचाकीवरून जात असताना मदत करणार्‍याने रस्त्यात थांबवले. मी माझ्या मित्राला घेऊन येतो, त्याची मदत होईल असे सांगून पीडित महिलेच्या पतीला रस्त्यात थांबवले आणि त्यांची दुचाकी घेऊन तेथून तो निघाला. दरम्यान, पीडित महिला घरात एकटीच होती. मध्यरात्री सव्वादोनच्या सुमारास मदत करणारा ‘तो’ व्यक्ती विवाहितेच्या घरी आला.

पीडित विवाहितेने दरवाजा उघडल्यानंतर तो बळजबरीने घरात घुसला. तू मला खूप आवडतेस, असे म्हणून अश्‍लील भाषा वापरत विनयभंग केला; तसेच विवाहितेवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला.  या वेळी प्रसंगावधान राखत हुशारीने विवाहितेने त्याच्या तावडीतून सुटका करवून घेतली आणि स्वतःची अबू्र वाचवण्यासाठी शयनगृहाच्या गॅलरीतून उडी मारली. यामध्ये महिलेच्या उजव्या पायास दुखापत झाली असून, डाव्या हाताच्या बोटाला मार लागला आहे. तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.