Tue, Jul 23, 2019 07:27होमपेज › Pune › महिलेवर जादूटोणा करणार्‍या मांत्रिकाला अटक  

महिलेवर जादूटोणा करणार्‍या मांत्रिकाला अटक  

Published On: Mar 15 2018 9:24PM | Last Updated: Mar 15 2018 9:24PMपुणे : प्रतिनिधी 

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या महिलेवर जादू टोण्याच प्रयोग करणार्‍या मांत्रिकाला अलंकार पोलिसांनी अटक केली. त्याला १७ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी विशाखा पाटील यांनी दिला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी डॉ. सतीश चव्हाण हा अद्याप फरार आहे. 

सचिन सदाशिव येरवडेकर (वय 48, रा. 306, कसबा पेठ) असे पोलीस कोठडी झालेल्या मांत्रिकाचे नाव आहे. अंधश्रध्देला चालना देणार्‍या डॉ. सतीश चव्हाण याच्यावर या प्रकरणात गुन्हा दाखल आहे. संध्या गणेश सोनवणे असे उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. त्यांचा भाऊ महेश विष्णू जगताप (वय 22, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी फिर्याद दिली होती. 

या प्रकरणात पोलिसांनी डॉ. सतीश चव्हाण आणि मांत्रिक येरवडेकर यांच्यावर महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ठ, अघोरी प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्याचे समुळ उच्चाटन करण्याबाबतच्या अधिनियम 2013 चे कलम 3 नुसार गुन्हा दाखल केला आहे. 

ही घटना 20 फेब्रुवारी ते 11 मार्च 2018 या कालावधीत स्वारगेट येथील चव्हाण नर्सिंग होम आणि दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात घडली. संध्या यांचे छातीमधील दुधाच्या गाठी काढण्याचे ऑपरेशन डॉ. सतीश चव्हाण यांच्या चव्हाण नर्सिंग होममध्ये करण्यात येते होते. हे ऑपरेशन करताना मोठा रक्तस्राव झाला होता. त्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांचा मृत्यू झाला होता. मात्र, त्यापूर्वी संध्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात असताना सकाळी 7 ते 8.30 ही वेळ यमाची घंटा आहे, असे सांगून त्यांच्या कुटुंबियांना ऑपरेशन करण्यापासून परावृत्त करण्यात आले. बरे होण्यासाठी संध्या यांना मंत्र पठण करण्यास सांगितले. मांत्रिकास बोलावून त्यांच्यावरून उतारा काढल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे.

यामध्ये येरवडेकर याला अटक करून पोलिसांनी न्यायालयात हजर केले. त्यावेळी मुख्य आरोपी डॉ. सतीश चव्हाण याच्या शोधासाठी आणि येरवडेकर मांत्रिक आहे. त्याने अशा प्रकारचे अन्य गुन्हे केले आहेत का, याच्या शोधासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील संध्या काळे यांनी केली. न्यायालयाने ती मंजूर केली. अलंकार पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक एस.जी.चव्हाण यांनी येरवडेकर याला न्यायालयात हजर केले.