Tue, Jun 25, 2019 15:31होमपेज › Pune › मेजर शशीधरन नायर यांच्‍या पार्थिवावर लष्‍करी इतमामात अंत्यसंस्कार

मेजर शशीधरन नायर यांच्‍या पार्थिवावर लष्‍करी इतमामात अंत्यसंस्कार

Published On: Jan 13 2019 1:39AM | Last Updated: Jan 13 2019 12:16PM
पुणे : प्रतिनिधी

जम्मू - काश्मीरमध्ये शुक्रवारी रात्री (दि. 11) झालेल्या स्फोटात शहीद झालेले खडकवासला येथील मेजर शशीधरन नायर यांचे पार्थिव शनिवारी सायंकाळी विशेष विमानाने पुण्यात आणण्यात आले. त्यानंतर त्यांचे पार्थिव दक्षिण मुख्यालयातील ‘नॅशनल वॉर मेमोरियल’ येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. येथे त्यांना आजी-माजी लष्करी अधिकार्‍यांकडून पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना देण्यात आली. त्यांच्या पार्थिवावर आज (दि. 13) सकाळी दहा वाजता नवी पेठेतील वैकुंठ स्मशानभूमी येथे सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मेजर शशीधरन नायर यांना अग्नी त्यांचा मावस भाऊ बारा वर्षीय आश्वत नायर याने दिला. अग्नी देण्यासाठी तो केरळवरून आला होता.

मेजर शशीधरन आणि पश्‍चिम बंगालचे जवान जीवन गुरंग (वय 24) हे जम्मू-काश्मीर येथे राजौरी जिल्ह्यात प्रत्यक्ष भारत-पाक नियंत्रणरेषेजवळ दहशतवाद्यांनी पेरून ठेवलेल्या ‘इम्प्रोवाइज्ड एक्स्प्लोझिव्ह डिव्हाइस’च्या (आयईडी) स्फोटात शहीद झाले. शशीधरन गोरखा रायफलमध्ये कार्यरत होते. 

नॅशनल मेमोरियल वॉर येथे शशीधरन यांची आजी, आई लता नायर, पत्नी तृप्ती, बहीण सीना हे कुटुंबिय उपस्थित होते. त्यांचे पार्थिव दक्षिण मुख्यालयाच्या रुग्णालयात रात्रभर ठेवण्यात येणार असून, सकाळी सात वाजता खडकवासला येथील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. 

मूळचे केरळचे असणारे नायर कुटुंबीय सध्या खडकवासला येथे स्थायिक झाले आहे. शशीधरन यांचा जन्म 30 जुलै 1985 रोजी झाला. त्यांनी केंद्रिय विद्यालयात शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर फर्ग्युसन महाविद्यालयात विज्ञान शाखेतून पदवीचे शिक्षण घेतले. येथेच त्यांनी ‘एनसीसी’मध्ये सहभाग घेऊन उत्कृष्ट स्नातक किताबही पटकावला होता. नंतर त्यांनी ‘एनडीए’ येथे तीन वर्षांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करत, सन 2007 मध्ये भारतीय लष्करात प्रवेश मिळविला. त्यांच्या सैन्यदलातील 11 वषार्र्ंच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक मोहिमांमध्ये सहभाग घेत नेत्रदीपक कामगिरी केली आहे. 

शशीधरन यांनी चार वषार्र्ंपूर्वी कॉलेजमधील दिव्यांग मैत्रीण व संगणक अभियंता तृप्ती यांच्याशी त्यांनी प्रेमविवाह केला. त्यांचे वडील विजय नायर यांचे काही वर्षापूर्वीच निधन झाले आहे.

‘आंटी तू डर मत; मुझे कुछ नही होगा’

‘आंटी तू डर मत, मुझे कुछ नही होगा’, अशा शब्दांत मेजर शशीधरन नायर यांनी त्यांच्या खडकवासला येथील घराशेजारील काकूंना आणि घरच्यांना आठ ते दहा दिवसांपूर्वी सीमेवर जाताना धीर देत निरोप घेतला होता. मात्र त्यांचा हा निरोप अखेचाच ठरला. आज त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक, शेजारी आणि मित्रमंडळींना त्या शब्दांच्या आठवणींमुळे गहिवरून येत आहे. आज (शनिवार, दि. 12) सकाळी ते शहीद झाल्याची बातमी धडकल्यानंतर शेजारी व नातेवाइकांनी त्यांच्या घरी गर्दी केली होती. 

जम्मू -काश्मीरमध्ये राजौरी जिल्ह्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ शुक्रवारी (ता. 11) रात्री झालेल्या ‘इम्प्रोवाइज्ड एक्स्प्लोझिव्ह डिव्हाइस’च्या (आयईडी) स्फोटात मेजर शशीधरन विजय नायर शहीद झाले. वयाच्या अवघ्या 33 व्या वर्षी त्यांना वीरमरण आले. नायर हे 2007 मध्ये सैन्यात भरती झाले होते.  मेजर शशीधरन यांची आई लता, छोटी बहीण सीना या मुकाईनगर, सिंहगड रोड, खडकवासला येथील कृष्णा हाईट्स इमारतीत राहतात. आई शालेय मुलांच्या शिकवणी घेतात, तर पत्नी तृप्ती या पायाने दिव्यांग असून, त्या पिंपरी चिंचवड परिसरात आई-वडिलांकडे राहतात. त्यांना मूलबाळ नाही. शशी यांचे वडील विजय नायर यांचे 6 वर्षांपूर्वी निधन झाले असून, ते खडकवासला येथील ‘वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन’ येथे रोखपाल म्हणून काम करत होते.