आरोग्य विभागही आता ‘टिकटॉक’वर!

Last Updated: Jun 04 2020 12:59AM
Responsive image


पुणे : पुढारी वृत्तसेवा

सर्वसामान्यांकडून विशेषतः किशोरवयीनांकडून होणारा टिकटॉक या मनोरंजक समाजमाध्यम अ‍ॅपचा मोठ्या प्रमाणात वापर पाहून राज्याच्या आरोग्य विभागालाही ते वापरण्याचा मोह आवरता आला नाही. कोरोनाच्या काळात प्रभावीपणे जनजागृती करण्यासाठी तसेच आरोग्य विभागाची कोरोनाविषयीची अधिकृत माहिती प्रसिद्ध करण्यासाठी आरोग्य विभागाकडूनही या प्लॅटफॉर्मचा उपयोग करण्यात येत आहे. इतकेच नव्हे तर फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप चॅटबोट आणि टि्वटर या डिजिटल माध्यमांचा वापर करून कोरोनाविषयक जनजागृती करण्यात येत असून त्याला वापरकर्त्यांकडूनही प्रतिसाद मिळत आहे.

राज्याच्या आरोग्य विभागाच्या कामकाजाच्या प्रसिद्धीची जबाबदारी ‘महाराष्ट्र आरोग्य आयईसी ब्यूरो’कडे आहे. त्याचे कार्यालय पुण्यातील येरवडा येथे आहे. कोरोनाला कसे ओळखायचे, त्यापासून प्रतिबंध कसा करायचा याची माहिती मनोरंजक पद्धतीने देण्यासाठी विभागाने ‘टिकटॉक’चा आधार घेतला आहे. या अ‍ॅपवर आरोग्य विभागाने सिनेअभिनेते, गायक, नामांकित डॉक्टर यांसह नामांकित व्यक्‍तींच्या संदेशाचे व्हिडिओ तयार करून ते अ‍ॅपवर अपलोड केले आहेत. अगदी आरोग्यमंत्री राजेश टोपे, ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन, ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांच्यासह प्रसिद्ध डॉक्टरांचे संदेश, कार्टून यांचे व्हिडिओ बघितले जात आहेत. त्यांना दादही मिळत आहे. 

टिकटॉकवरील अकाउंट लोकप्रिय

टिकटॉकवर आरोग्य विभागाने ‘महा आरोग्य आयईसी’ या नावाने प्रोफाईल तयार केले आहे. त्याला 1 लाख 48 हजार जणांनी फॉलो केले असून जवळपास 14 लाख जणांंनी लाईक केले आहे. यावर अपलोड केलेल्या व्हिडिओला 10 ते 24 हजार दर्शकांनी पाहिलेले आहे. त्यामुळे, आरोग्य विभागाची वस्तूनिष्ट आणि खरी माहिती नागरिकांना मिळण्यास मदत होत आहे.

हे आहेत संदेश

शारीरिक अंतर पाळा, वारंवार हात धुवा, कोणतीही  वस्तू, गाडीची चावी घरात नेण्यापूर्वी सॅनिटायझरने स्वच्छ करून घ्या, कोरोनाची साखळी कशी तोडायची हे व आणखी कोरोनाप्रतिबंधात्मक बचाव करण्याचे संदेश  व्हिडिओच्या माध्यमातून दिले जात आहेत. यापैकी काही व्हिडिओ कार्टूनच्या स्वरूपात असून त्यांना सर्वाधिक पसंती मिळत आहे.

या समाजमाध्यमांवरही माहिती

केवळ टिकटॉकच नव्हे तर फेसबुक, ट्वीटर, व्हॉट्सअ‍ॅप चॅटबोट या समाजमाध्यमांवरही राज्याच्या आयईसी ब्युरोने अकाउंट ओपन केले असून त्यावरूनही आरोग्य विभागाची कोरोनाविषयक काय खबरदारी घ्यावी, याची अधिकृत माहिती दिली जात आहे.