Mon, Apr 22, 2019 16:22होमपेज › Pune › महाराष्ट्र केसरी कुस्तीचा थरार २० डिसेंबरपासून

महाराष्ट्र केसरी कुस्तीचा थरार २० डिसेंबरपासून

Published On: Dec 16 2017 8:09PM | Last Updated: Dec 17 2017 12:15AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ, मुळशी तालुका कुस्तीगीर संघ, समस्त ग्रामस्थ भूगांव व मल्लसम्राट प्रतिष्ठान यांच्या वतीने आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने ६१ वी वरिष्ठ गट राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मुळशी तालुक्यातील भूगांव येथे ही स्पर्धा दिनांक २० ते २४ डिसेंबर दरम्यान होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

स्पर्धेचे उद्घाटन गुरुवार, दिनांक २१ डिसेंबर रोजी राज्याचे क्रीडा मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी पालकमंत्री गिरीष बापट, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्‍वास देवकाते आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तर रविवार, दिनांक २४ डिसेंबर रोजी स्पर्धेच्या समारोपाला महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आदी उपस्थित राहणार आहेत.

यावेळी पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष संदीप भोंडवे, आंतरराष्ट्रीय पंच दिनेश गुंड, स्पर्धा संयोजन समितीचे शांताराम इंगवले, मुळशी तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष शिवाजी तांगडे, स्वस्तिक चोंधे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. स्पर्धेत यंदा डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील (सांगली), गतवर्षीचा उपमहाराष्ट्र केसरी अभिजीत कटके , शिवराज राक्षे, तानाजी झुंजुरके, साईनाथ रानवडे (सर्व पुणे),  सागर बिराजदार (लातूर), किरण भगत (सातारा), महेश वरुटे,कौतुक डाफळे (कोल्हापूर), माऊली जमदाडे, महादेव सरगर (सोलापूर) आदी अव्वल मल्ल जेतेपदासाठी लढतील. इतर वजनी गटात सुरज कोकाटे, गणेश जगताप, अभिषेक तुरकेवाडकर, तानाजी विरकर, ज्योतिबा आटकळ असे अनेक अव्वल मल्ल झुंजताना दिसतील.

स्पर्धा माती व गादी विभागात प्रत्येकी १० गटात होणार आहे. यात अ गटात ५७, ७४, ७९ किलो, ब गटात ६१, ७०, ८६ किलो, क गटात ९७ किलो आणि महाराष्ट्र केसरी साठी ८६ ते १२५ किलो वजनी गटाचा समावेश आहे. ड विभागात ६५ आणि  ९२ किलो वजनी गटाचा समावेश आहे. स्पर्धेत महाराष्ट्रातील ४५ जिल्हा व शहर तालीम संघातील तब्बल ९०० मल्ल सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर ९० मार्गदर्शक आणि संघव्यवस्थापक, १२५ तांत्रिक अधिकारी व ८० पदाधिकार्‍यांचे स्पर्धेसाठी सहकार्य मिळणार आहे. मंगळवार दिनांक १९ डिसेंबर रोजी खेळाडूंची वजने आणि वैद्यकीय तपासणी होणार आहे. 

महाराष्ट्र केसरी विजेत्याचा किताब पटकाविणार्‍या मल्लास चांदीची गदा देऊन सन्मानित करण्यात येईल. तसेच चारचाकी गाडी बक्षीस स्वरुपात देण्यात येणार आहे. उपमहाराष्ट्र केसरीसाठी बुलेट व ९७ किलो वजनी गटातील गादी आणि माती विभागातील विजेत्याला देखील बुलेट देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.