Mon, Jun 24, 2019 20:58होमपेज › Pune › मावळात आशा सेविकांनी कसली कंबर

मावळात आशा सेविकांनी कसली कंबर

Published On: Jan 17 2018 2:03AM | Last Updated: Jan 17 2018 12:41AM

बुकमार्क करा
वडगाव मावळ : गणेश विनोदे

मावळ तालुक्यातील सुमारे 50 हजार लाभार्थ्यांना फेब्रुवारी अखेरपर्यंत विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या लाभार्थी विशेष शोधमोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत असून प्रामुख्याने आशा सेविकांकडून लाभार्थी शोधमोहीम जोमात सुरू आहे.

सामाजिक न्याय विभाग व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णयानुसार सामाजिक अर्थसहाय्य योजना प्रभावीपणे राबवून मावळ तालुक्यातील एकही पात्र लाभार्थी शासनाच्या कल्याणकारी योजनांपासून वंचित राहू नये यासाठी, 1 जानेवारीपासून लाभार्थी विशेष शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. तहसीलदार रणजित देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम दि.28 फेबु्रवारीपर्यंत सुरू राहणार असून या मोहिमेच्या माध्यमातून फेबु्रवारीअखेर तालुक्यातील सुमारे 50 हजार लाभार्थ्यांपर्यंत विविध शासकीय योजना पोहचवून त्या योजनांचा लाभ संबंधित लाभार्थ्यांना मिळवून देण्यात येणार आहे. 

मोहीम यशस्वी करण्यासाठी आशा सेविका, सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, गावकामगार तलाठी, कृषि सहाय्यक, मंडल अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच, संबंधितांची कार्यशाळाही आमदार संजय (बाळा) भेगडे, सभापती गुलाबराव म्हाळसकर, उपसभापती शांताराम कदम यांच्या उपस्थितीत घेण्यात आली होती.

आशा सेविकांनी संबंधित गावांतील लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून अर्ज भरून घेणे अथवा अर्ज उपलब्ध करून देणे, सरपंच-उपसरपंच यांनी विशेष ग्रामसभा घेऊन संभाव्य पात्र लाभार्थ्यांची यादी तयार करणे, ग्रामसेवकांनी संबंधित गावामध्ये शासकीय योजनांचे निकष समजावून सांगून ग्रामसभेबद्दल प्रसिध्दी करणे व आशा सेविकांना आवश्यक असलेली माहिती, दाखले देणे ही जबाबदारी देण्यात आली आहे.

राष्ट्रीय कुटुंब लाभ व अनाथ मुलांसाठी आवाहन
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत दारिद्ˆय रेषेखालील कुटुंबातील जानेवारी 2017 नंतर मृत झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना फक्त दारिद्ˆयरेषेखाली असल्याचा दाखला दिल्यास तत्काळ 20 हजार रुपये मदत, तर 18 वर्षांखालील अनाथ मुलांना संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत महिना 600 रुपये मानधन सुरू करता येईल. यासाठी तत्काळ अर्ज करण्याचे आवाहन तहसीलदार रणजित देसाई, नायब तहसीलदार सुनंदा भोसले यांनी केले आहे.

लाभार्थी विशेष शोधमोहीम कार्यक्रम
दि.1 ते 15 जानेवारीपर्यंत आशा सेविकांवर सर्वेक्षण करून पात्र लाभार्थ्यांना अर्ज उपलब्ध करून देण्याची जबाबदारी होती.  16 ते 30 जानेवारीदरम्यान मंडलनिहाय शिबिरांचे आयोजन करून आवश्यक दाखले देणे, दि.1 ते 10 फेबु्रवारीदरम्यान आमआदमी योजनेतील लाभार्थ्यांना अर्ज उपलब्ध करून देऊन ते ऑनलाईन भरणे व छाननी करणे, दि.10 ते 15 फेबु्रवारी संजय गांधी योजना समितीची बैठक घेणे, दि.15 ते 28 लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळवून देणे व दि.28 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयास अहवाल सादर करणे, असे नियोजन करण्यात आले आहे.