Sat, Dec 15, 2018 19:36



होमपेज › Pune › दुधाच्या अनुदानप्रश्‍नी चेंडू सरकारच्या कोर्टात

दुधाच्या अनुदानप्रश्‍नी चेंडू सरकारच्या कोर्टात

Published On: Dec 07 2018 1:52AM | Last Updated: Dec 07 2018 1:52AM




पुणे : प्रतिनिधी  

राज्य सरकारने गाईच्या दुधाला प्रति लिटरला पाच रुपयांचे अनुदान घोषित केल्यानंतर व योजनेस मुदतवाढ देवूनही मागील खरेदीमधील थकित अनुदानाचा आकडा सुमारे 200 कोटींच्या आसपास गेला आहे. त्यामुळे 1 नोव्हेंबरपासून दुधाची खरेदी प्रति लिटरला 25 रुपये दराने झालेली असली तरी शेतकर्‍यांना 20 रुपयांप्रमाणेच रक्कम देण्यात येईल. सरकारकडून पाच रुपये अनुदान मिळाल्यानंतर ती रक्कम शेतकर्‍यांना देण्याचा निर्णय गुरुवारी (दि.6) रात्री झालेल्या बैठकीत घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.

राज्य सरकारकडून दूध अनुदान योजनेची मुदत जानेवारी 2019 पर्यंत म्हणजे तीन महिन्यांनी पुन्हा वाढविण्यात आली. या दरम्यानच्या काळात थकित अनुदान न मिळाल्यास योजनेतून बाहेर पडण्याचा इशारा दूध डेअर्‍यांनी दिला होता. मात्र, अनुदान दिले जाण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे योजना कायम राहिली. असे असूनही योजनेनुसार शेतकर्‍यांना डेअर्‍यांनी 3.5 फॅट आणि 8.5 एसएनएफ गुणप्रतिच्या दुधाला लिटरला 25 रुपये दर दिला. मात्र, पाच रुपयांचे अनुदान सरकारकडून न आल्यामुळे रक्कम अडकून पडली आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्य दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाचे मानद सचिव प्रकाश कुतवळ आणि ‘चितळे दूध’चे संचालक श्रीपाद चितळे यांनी दिली. 

याबाबत ‘पुढारी’शी बोलताना ते म्हणाले की, राज्यातील  सहकारी आणि खाजगी दूध डेअर्‍यांची संयुक्त बैठक येथे रात्री झाली. त्यामध्ये हा निर्णय एकमताने घेण्यात आलेला आहे. हवं तर सरकारने अनुदानाची पाच रुपयांची रक्कम थेट दूध उत्पादक शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर जमा करावी. त्याची सर्व माहिती आम्ही पुर्वीप्रमाणेच सरकारला उपलब्ध करुन देवू. आजपर्यंत दूध डेअर्‍यांना 10 सप्टेंबरपर्यंतचे दुधाचे अनुदान मिळाले आहे. पुढील आजपर्यंतचे अनुदान थकित असल्याने हा निर्णय घ्यावा लागत आहे.  

पॉलिथीन बंद झाल्यास दूधाचे पाऊच पॅकिंग अडचणीत...
महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने प्लास्टिक उत्पादकांना विस्तारीत उत्पादक जबाबदारी अंतर्गत (ईपीआर)  प्लास्टिकच्या पुनर्संकलनाची जबाबदारी दिलेली असून ही बाब अशक्य असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यावर संबंधित उत्पादकांवर कारवाई झालेली असून दुधाच्या पॉलिथीन पॅकिंग फिल्मचे उत्पादन 15 डिसेंबरपासून बंद करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. त्यामुळे पॉलिथीन ज्या दिवशी मिळणे बंद होईल, त्यावेळी दूधाचे पाऊच पॅकिंग करणे आपोआपच अडचणीत येणार असल्याचेही कुतवळ यांनी सांगितले.