Sun, Jul 12, 2020 20:28होमपेज › Pune › भर रस्त्यात प्रेयसीचा निर्घृण खून

भर रस्त्यात प्रेयसीचा निर्घृण खून

Published On: Jun 13 2019 1:36AM | Last Updated: Jun 13 2019 1:36AM
पुणे : प्रतिनिधी 

प्रेम प्रकरणात धोका दिल्याच्या कारणातून एका आयटी अभियंत्याने  प्रेयसीचा चाकूने सपासप वार करीत निर्घृण खून केल्याचा  प्रकार चंदननगर परिसरात मंगळवारी (दि.11) रोजी रात्री अकराच्या सुमारास येथील पाण्याच्या टाकीजवळील सिग्नल शेजारी घडला. प्रेयसीचे दुसर्‍या तरुणासोबत संबंध असल्याच्या संशयातून या अभियंत्याने हा खून केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. विना पटले (वय-23, रा. मुळ गोंदिया ) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे.घटनेनंतर आरोपी फरार झाला आहे.  याप्रकरणी प्रकाश बापू गपाट ( वय 24, रा. थेरगाव, मुळ- वाशी उस्मानाबाद)  यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी अभियंता किरण अशोक शिंदे (वय- 25 रा. काळेवाडी फाटा थेरगाव) याच्या विरुद्ध चंदननगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा पिंपरी-चिंचवड येथील एका कॉलेजमध्ये इंजिनीअरींगच्या अभ्यासक्रामला असून, तो वल्लभनगर येथील एका कॉलसेंटरमध्ये काम करतो. याच दरम्यान त्याची कॉलसेंटरमध्ये काम करणार्‍या विना पटले या तरुणीची ओळख झाली. ओळखीचे रुपांतर पुढे प्रेमात झाले. मागील एक वर्षापासून या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. परंतु काही दिवसापूर्वी त्यांच्यामध्ये वाद झाला होता. आरोपी शिंदेला विनाचे दुसर्‍या तरुणासोबत संबंध असल्याचा संशय होता. त्यामुळे मागील काही दिवसांपासून तो सतत तणावात होता. 

फिर्यादी गपाट हा आरोपीचा मित्र असून, त्याला या दोघांच्या प्रेम प्रकरणाची कल्पना होती. दोन दिवस किरण घरी आला नसल्यामुळे याची माहिती त्याच्या घरच्यांनी प्रकाशला दिली. त्यानुसार तो इतर मित्रांच्या मदतीने मोबाईल लोकेशनवरून किरणचा शोध घेत होता. दरम्यान तो टाटा गार्डन या ठिकाणी असल्याची माहिती त्याला मिळाली. त्याला संपर्क करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याने या सर्वांचे मोबाईल क्रमांक ब्लॅक लिस्टमध्ये टाकले होते. त्यानंतर फिर्यादीने तरुणीच्या मोबाईलवर फोन करून त्यांचा पत्ता शोधून काढला. या वेळी रात्री 10 च्या सुमारास आरोपी तरुणी सोबत थांबलेला त्यांना दिसला. 

फिर्यादीने आरोपीला घरी सर्वजण वाट पाहत असल्याचे सांगत घरी येण्यास सांगितले. मात्र, किरण हा सुडाने पेटला होता. सोड मला, हिने मला फसविले आहे असे म्हणत त्याने आपल्या बॅगेतील चाकू काढून तरुणीवर चाकूने सपासप वार केले. त्यानंतर तरुणी आरोपीच्या तावडीतून सिग्नलकडे पळाली. याच वेळी आरोपीदेखील तिच्या पाठीमागे धावत होता. सिग्नला उभी असलेली काही मुुले आरोपीला पकडण्यासाठी धावली. परंतु तो फरार झाला. यानंतर फिर्यादी, ट्रॅफिक पोलिस व नागरिकांनी तरुणीला रिक्षातून नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी घटनास्थळाकडे धाव घेत आरोपीच्या मागावर पथक रवाना केले आहे.

जुन्या प्रेम प्रकरणातून हा प्रकार झाला आहे. त्या दोघांमध्ये प्रेम संबंध होते. मात्र, काही दिवसापूर्वी दोघांमध्ये वाद झाले. त्यातून ते वेगळेही झाले होतेे. घरच्यांनीदेखील त्यांना समजवून सांगितले होते. पूर्वी ही तरुणी काळेवाडीला राहत होती. पुन्हा सदर ठिकाणी एकत्र भेटल्यानंतर दोघामध्ये बोलण्यातून वाद झाला. यातून आरोपीने चाकूने तिच्यावर वार केले. घटनेची माहिती मिळताच आरोपीच्या मागावर पथक रवाना केले असून, आरोपीचा शोध सुरू आहे.
कृष्णा इंदलकर, वरिष्ठ निरीक्षक चंदननगर पोलिस ठाणे