Tue, Mar 26, 2019 21:52होमपेज › Pune › लग्नासाठी तरूणी हट्टाला पेटली; प्रियकराने केली मारहाण

लग्नासाठी तरूणी हट्टाला पेटली; प्रियकराने केली मारहाण

Published On: Feb 04 2018 1:03PM | Last Updated: Feb 04 2018 12:54PMपुणे : प्रतिनिधी

ते दोघेही एकाच परिसरात राहण्यास...दोघेही महाविद्यालयीन विद्यार्थी...त्यामुळे त्यांची ओळख  झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. प्रेमात लग्नाच्या आणाभाका घेतल्या. पण, काही दिवसांनी  प्रियकर लग्नाला नकार देऊ लागला, परंतु तिचे त्याच्यावर जिवापाड प्रेम आणि त्याच्यासोबतच लग्न करण्याचा निश्‍चय तिला स्वस्थ बसू देईना... मग, ती त्याच्याकडे लग्नाचा हट्ट धरू लागली... यामुळे  संतापलेल्या प्रियकराने तिला चक्क मारहाण केली आणि अश्‍लील फोटो  सोशल मीडियावर टाकण्याची धमकी दिली.

कोथरूड परिसरात हा प्रकार घडला असून, याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल  करण्यात आला आहे. याप्रकरणी अक्षय ऊर्फ शुभम गणेश  मोहिते (वय 23, रा. वारजे माळवाडी) याच्यावर कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 23 वर्षीय तरुणीने  फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी ही एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. तर, अक्षय ऊर्फ  शुभम मोहितेही एका महाविद्यालयात शिक्षण घेतो. दरम्यान चार  वर्षापूर्वी फिर्यादी तरुणी व अक्षय हे एकाच परिसरात राहण्यास होते. त्यातून त्यांची ओळख झाली. आपसूकच ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचे वचन एकमेकांना दिले. परंतु,  नव्याने नऊ दिवस संपल्यानंतर काही दिवसांनी दोघांमध्ये खटके उडण्यास सुरुवात झाली. तरीही  तरुणींने त्याच्याकडे लग्न करण्याचा हट्ट धरला. मात्र, अक्षयने तरुणीसोबत लग्न करण्यास नकार दिला. 

लग्नाला नकार दिल्यानंतर आणखीनच वाद होऊ लागले. त्यानंतरही अक्षय तिला भेटण्यास बोलावत असे.  तरुणीने भेटण्यास नकार दिल्यानंतर तिचे अश्‍लील फोटो व्हॉट्सअप व सोशल मीडियावर  टाकण्याची धमकी देत असे. यातच त्यांच्यात लग्नावरून वाद झाला. या वादातून त्याने तरुणीला मारहाण केली. त्यानंतर तरुणींने पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास महिला सहाय्यक निरीक्षक धोत्रे या तपास करत आहेत.