होमपेज › Pune › दूध पावडरच्या दरवाढीमुळे ग्राहकांची लूट 

दूध पावडरच्या दरवाढीमुळे ग्राहकांची लूट 

Published On: Aug 14 2018 1:35AM | Last Updated: Aug 14 2018 1:35AMपुणे : प्रतिनिधी

दूध पावडर निर्यातीला अनुदान मिळताच गाईच्या दुधाच्या विक्री दरात लिटरला दोन रुपयांची वाढ करताना, खासगी उत्पादकांकडून पावडरच्या दरात किलोमागे 20 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. दूध पावडरचा भाव किलोस 125 ते 127 रुपयांवरून थेट 145 रुपये करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना आर्थिक झळ बसत असताना, आता ग्राहकांनाही जादा भावाचा भुर्दंड घालून, या खासगी पावडर उत्पादकांकडून लूट सुरूच आहे. यातून सहकारी चळवळीपेक्षा खासगी दूध पावडर उत्पादक प्रबळ होत असल्याचे चित्र उभे राहिले.

जागतिक बाजारात दूध पावडरचे भाव घटल्याचे कारण देत, गायीच्या दुधाची खरेदी लिटरला 27 रुपयांवरून 17 रुपये करण्यात आली. त्यामुळे शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन हाती घेतल्यानंतर 3.5 फॅट आणि 8.5 एसएनएफ गुणप्रतीच्या गायीच्या दुधाला लिटरला 25 रुपये दर निश्‍चित करून, 1 ऑगस्टपासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली. या सर्व स्थितीत दूध पावडर उत्पादन घेण्यामध्ये सहकारी दूध संघाचा वाटा नगण्य आहे, तर खासगी दूध पावडर उत्पादकांकडे मुबलक दूध पावडर साठा आहे. त्यामुळे पावडरचे दर घटले, हे कारण पुढे करून दुधाचे दर पाडले गेले. त्याचेच भांडवल पुढे करून उत्पादकांनी दूध पावडर निर्यातीला सरकारकडून अनुदान मंजुरीचा लाभही पदरात पाडून घेतला आहे.  अनुदान मिळाल्यानंतर गायीच्या दुधाच्या विक्री दरात लिटरला 2 रुपयांनी वाढ करतानाच, या खासगी दूध पावडर उत्पादकांनी आता पावडरच्या दरात किलोमागे 20 रु. वाढ केली.

पावडरच्या दरात वाढ झाल्याने हा भाव 145 रुपयांपर्यंत नेला आहे. शेतकर्‍यांना सातत्याने आर्थिक नुकसान देतानाच सरकारकडून अनुदान लाटूनही ग्राहकांच्या खिशाला दरवाढीचा भुर्दंड दिला आहे. अशा प्रकारामुळे खासगी दूध पावडर उत्पादक अधिक प्रबळ होत असल्याची टीका दुग्ध वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे सहकारी चळवळीला पाठबळ देण्यासाठी शासन कोणती पावले उचलणार याकडे सहकारी दूध संघांचे लक्ष लागले आहे. शिवाय खासगी दूध उद्योगाच्या वर्चस्वाला छेद देण्यासाठी शासन कोणती भूमिका घेणार आणि सहकारी दूध संघ आणि शासनाच्या आरे दूध ब्रॅण्डला पाठबळ देण्यासाठी कोणते धोरण आणणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.