Sat, Jan 19, 2019 07:31होमपेज › Pune › ‘ड्यूक नोज’च्या दरीत पडून पर्यटकाचा मृत्यू

‘ड्यूक नोज’च्या दरीत पडून पर्यटकाचा मृत्यू

Published On: Aug 20 2018 1:40AM | Last Updated: Aug 20 2018 1:40AMलोणावळा : वार्ताहर 

लोणावळ्यात फिरायला आलेला एका तरुण पर्यटकाचा रविवारी (दि. 19) दुपारी ‘ड्यूक नोज’च्या सुमारे 350 ते 400 फूट खोल दरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला.  रोहन महाजन (30, रा. भिवंडी, ठाणे) असे त्याचे नाव आहे. तो सीनिअर सेक्शन इंजिनिअर म्हणून रेल्वेमध्ये नोकरीस होता. 

आपल्या काही मित्रांसोबत रोहन लोणावळ्यात रविवारी फिरण्यासाठी आला होता. या ठिकाणी ‘ड्यूक नोज’ येथे तो फिरायला गेला. तेथून पुन्हा परतत असताना दुपारी साडेतीन ते चारच्या सुमारास पाय घसरून तोल गेल्याने रोहन खाली दरीत पडला. सदर माहिती मिळताच लोणावळा पोलिसांनी स्थानिक बचाव पथक शिवदुर्ग मित्र यांना पाचारण करीत रोहन याचा शोध सुरू केला.

रविवारी  सायंकाळी साडेसहा वाजता शिवदुर्गच्या पथकास रोहन याचा मृतदेह मिळून आला. शिवदुर्गच्या रोहित वर्तक, समीर जोशी, ओंकार पडवळ, प्रणय आंबुरे, योगेश आंबुरे, प्रवीण ढोकळे, सनी कडू, अजय शेलार व सुनील गायकवाड या सदस्यांनी या बचाव कार्यात सहभाग घेतला. याप्रकरणी पुढील तपास लोणावळा पोलिस करत आहेत.