लोणी काळभोर : प्रतिनिधी
थेऊर (ता. हवेली) येथील मुळा-मुठा नदीवर धुणे धुण्यासाठी गेलेल्या दोन महिलांसह एक लहान मुलगी नदीप्रवाहात वाहून गेली. त्यापैकी लहान मुलगी काही अंतरावर सापडली; परंतु उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. दोन्ही महिलांचा अद्याप पत्ता लागला नव्हता. महसूल विभागाचे राष्ट्रीय आपत्ती मदत केंद्राने नदीपात्रात शोधकार्य सुरू केले आहे.
थेऊर (ता. हवेली) येथील रमा माधव स्मारकाशेजारील मुळा-मुठा नदी घाटावर रात्र गस्त घालणारा गुरखा भगतसिंह भूल यांची सून चंद्रकला एकराज ऊर्फ राजू भूल (23), मुलगी भजन भरतसिंग भूल (19), नात बेनिया एकराज भूल (4) तसेच आनिशा शंकर भूल व नातू अभिषेक शंकर भूल सर्व कपडे धुण्यासाठी सोमवारी (दि.3) दुपारी 12.30 वा. आले. यानंतर दुपारी दोनच्या सुमारास अनिशा व अभिषेक यांनी घरी धावत येऊन तिघीजणी पाण्यात वाहत गेल्याचे सांगितले. त्यानंतर भरतसिंग भूल नदीकडे धावले. तोपर्यंत गावातील नागरिक नदीवर धावले होते.
येथून काही अंतरावर बेनिया ही नदीच्या कडेला पाण्यावर दिसल्याने नागरिकांच्या मदतीने तिला बाहेर काढून उपचारासाठी दवाखान्यात पाठविले; परंतु उपचारांपूर्वी तिचा मृत्यू झाला होता.
या घटनेनंतर ग्रामविकास अधिकारी मुरलीधरन बडे; तसेच तलाठी पलांडे यांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली व पोलिसांना याची माहिती दिली. लोणी काळभोर पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. यात पोलिस उपनिरीक्षक गणेश पिंगवले व सहकारी यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली.
त्यानंतर पोलिस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील व उपविभागीय पोलिस अधिकारी सुहास गरुड यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. या घटनेची माहिती महसूल विभागासमोर देऊन राष्ट्रीय आपत्ती मदत केंद्रास कळविण्यात आले. पाण्याचा प्रवाह फार असल्याने महिलांचे मृतदेह शोधण्यासाठी अडचण आली. मंडलाधिकारी दगडे व तलाठी पलांडे घटनास्थळी तळ ठोकून होते.