पुणे : प्रतिनिधी
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निवडणुका नुकत्याच संपल्या आहेत. येत्या काही दिवसांवर साहित्य संमेलन येऊन ठेपले आहे. या मोठ्यांच्या साहित्य संमेलनाशी बालसाहित्य जोडले जावे, याकरिता येत्या साहित्य संमेलनात बालसाहित्याला व्यासपीठ मिळून चिमुकल्यांच्या साहित्याला वाव मिळावा, अशी मागणी आमरेंद्र गाडगीळ बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष बालसाहित्यिक ल. म. कडू यांनी अ. भा. मराठी साहित्य संमेनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांना केली.
बडोदा येथे होणार्या 91 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख आणि शेवगाव येथे होणार्या 27 व्या बालकुमार मराठी साहित्य संमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष ल. म. कडू यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी चित्रपट महामंडळाच्या संचालिका निकीता मोघे, संवाद पुणेचे सुनील महाजन, उपाध्यक्ष माधव राजगुरू, कोषाध्यक्ष दिलीप गरूड उपस्थित होते.
यावेळी लक्ष्मीकांत देशमुख यांनी साहित्य संमेलनात बालसाहित्याला वाव मिळावा, या मागणीला पाठिंबा दर्शवित अखिल भारतीय महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सांगितले. आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांचा प्रशासकीय कामकाजाचा अनुभव दांडगा असून कला क्षेत्राविषयी देखील त्यांना आस्था आहे. त्यामुळेच नाट्य-चित्रपट सृष्टीतील प्रश्न सोडविण्यासाठी देशमुख यांनी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा महाजन यांनी यावेळी व्यक्त केली.